Video: न बोलता कठीण प्रसंगी अंतराळवीर अवकाशात कसा संवाद साधतात? Nasa नं शेयर केला व्हिडीओ
By सिद्धेश जाधव | Published: May 3, 2022 07:27 PM2022-05-03T19:27:06+5:302022-05-03T19:27:16+5:30
Video: अंतराळवीर अवकाशात शब्दांविना कशाप्रकारे संवाद साधतात हे एका व्हिडीओमधून नासानं समजावून सांगितलं आहे.
अवकाशात सगळ्याच गोष्टी वेगळ्या असतात. त्यामुळे तिथं राहण्याची, खाण्याची, काम करण्याची, बोलण्याची आणि अगदी झोपण्याची पद्धत सुद्धा वेगळी असते. अंतराळवीर वेगवेगळे पद्धतींचा वापर करून या गोष्टी पृथ्वीबाहेर असलेल्या स्पेस स्टेशनमध्ये करत असतात. अंतराळात ध्वनी लहरींना प्रवास करण्यासाठी माध्यम नसतं म्हणून स्पेस मिशनमध्ये अंतराळवीर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी रेडियो सिस्टम आणि कम्युनिकेशन चॅनल्सच्या नेटवर्कचा वापर करतात. परंतु ही सेवा ठप्प झाली तर?
आपत्कालीन परिस्थितीत रेडियो सिस्टम बंद झाल्यास किंवा मिशन गडबडल्यास किंवा स्पेस वॉक करताना अंतराळवीर एकमेकांशी कशाप्रकारे संवाद साधतात, याचा एक व्हिडीओ यूएस स्पेस एजन्सी NASA नं STEM या युट्युब चॅनेलवर शेयर केला आहे. हे युट्युब चॅनेल खासकरून विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आलं आहे. या व्हिडीओमध्ये अवकाशात आकडे आणि हातवारे करून संवाद साधला जातो असं सांगण्यात आलं आहे. परंतु हे इशारे स्कुबा डायव्हर्स आणि पायलट देखील काहीशा अशा पद्धतींचा वापर करताना दिसतात.
नासानं शेयर केलेला व्हिडीओ:
नासानं शेयर केलेल्या व्हिडीओमध्ये अंतराळवीर राजा चारी आणि कायला बॅरोन दिसत आहेत. त्यांनी काही रंजक गोष्टी शब्दांविना कशाप्रकारे व्यक्त करता येतात हे दाखवलं आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर राहत आणि काम करताना ट्रेनिंगदरम्यान ते या गोष्टी शिकले आहेत. त्यानुसार, सगळं काही ठीक आहे की नाही हे विचारण्यासाठी आणि सांगण्यासाठी हाताने इशारा केला जातो. तसेच एकाच हाताने 1 ते 10 आणि त्यापुढील आकडे देखील कळवले जातात. या गोष्टी तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता.