इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसह येणार विवो व्ही ११ प्रो
By शेखर पाटील | Published: August 21, 2018 10:45 AM2018-08-21T10:45:08+5:302018-08-21T10:45:24+5:30
विवो कंपनी ६ सप्टेंबर रोजी व्ही ११ प्रो हा स्मार्टफोन लाँच करणार असून यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसह विविध दर्जेदार फिचर्सचा समावेश असणार आहे.
विवो कंपनी ६ सप्टेंबर रोजी व्ही ११ प्रो हा स्मार्टफोन लाँच करणार असून यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसह विविध दर्जेदार फिचर्सचा समावेश असणार आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधा काही निवडक स्मार्टफोन्समध्ये देण्यात आली आहे. विवो कंपनीने याआधी आपल्या विवो एक्स-२१ आणि नेक्स मालिकेत या प्रकारातील मॉडेल्समध्ये या प्रकारचे फिचर देण्यात आले आहे. अर्थात या प्रकारच्या स्मार्टफोनमध्ये मागील बाजू अथवा डिस्प्लेच्या खाली फिंगरप्रिंट स्कॅनर नसून ते डिस्प्लेच्याच खाली दिलेले असते. या अनुषंगाने विवो कंपनीच्या आगामी व्ही ११ प्रो या मॉडेलमध्येही हे फिचर असेल असे संकेत मिळाले आहेत.
६ सप्टेंबर रोजी हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी विवो कंपनीने प्रसारमाध्यमांना आमंत्रण पाठविले असून या कार्यक्रमाचा टिझरदेखील जाहीर केला आहे. यात या आगामी स्मार्टफोनमध्ये डिस्प्लेच्याच खाली फिंगरप्रिंट स्कॅनर असेल याचे संकेत देण्यात आले आहेत. तर याचे विविध फिचर्सदेखील लीक झालेले आहेत. या लीक्सचा विचार केला असता, विवो व्ही ११ प्रो या मॉडेलमध्ये ६.४१ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजे २३४० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा सुपर अमोलेड या प्रकारातील डिस्प्ले असू शकतो.
स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६६० हा प्रोसेसर असेल. रॅम ६ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. याच्या मागील बाजूस १२ आणि ५ मेगापिक्सल्सचा ड्युअल कॅमेरा सेटअप असून फ्रंट कॅमेरा २५ मेगापिक्सल्स क्षमतेचा असणार आहे. यातील बॅटरी ३,४०० मिलीअँपिअर क्षमतेची असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो ८.१ या प्रणालीवर चालणारे असू शकते.