सॅमसंग-शाओमीला विसरा! दोन-दोन डिस्प्लेसह आला भन्नाट Vivo X Fold; मिळणार 512GB मेमरी
By सिद्धेश जाधव | Published: April 12, 2022 12:30 PM2022-04-12T12:30:56+5:302022-04-12T12:31:08+5:30
Vivo X Fold हा कंपनीचा सर्वात पहिला फोल्डेबल स्मार्टफोन आहे. यात 50MP कॅमेरा, 12GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट आणि 46000mAh बॅटरी आहे.
Vivo नं काल चीनमध्ये लाँच झालेल्या एका इव्हेंटमधून आपला अनोख्या डिवाइसचा पेटारा उघडला आहे. कंपनीनं Vivo X Fold नावाचा पहिला फोल्डिंग फोन सादर केला आहे. सोबत Vivo X Note आणि Vivo Pad टॅबलेट देखील बाजारात आला आहे. परंतु दोन डिस्प्लेसह येणाऱ्या Vivo X Fold ची चर्चा सर्वाधिक केली जात आहे. फोल्डिंग फोन्स सेगमेंटमध्ये सध्या सॅमसंगचं राज्य आहे त्यामुळे हा डिवाइस नक्कीच सॅमसंगला चांगली टक्कर देईल.
Vivo X Fold चे स्पेसिफिकेशन्स
Vivo X Fold मध्ये दोन डिस्प्ले आहेत. बाहेरच्या अॅमोलेड डिस्प्लेचा आकार 6.53 इंच आहे. तर आतल्या बाजूस 8.03 इंचाचा फोल्ड अर्थात घडी होणारा मोठा डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 1800x2200 पिक्सल रिजोल्यूशन आणि LTPO3 ला सपोर्ट करतो. दोन्ही डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि इन-डिस्प्ले अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट स्कॅनरसह येतात. फोल्डिंग डिस्प्ले 60 व 120 डिग्री अँगलवर देखील खुला करून ठेवता येतो.
Vivo X Fold ची प्रोसेसिंग पावर देखील तशीच देण्यात आली आहे. यात क्वॉलकॉमचा सर्वात शक्तिशाली Snapdragon 8 Gen 1 चिपसेट मिळतो. सोबत 12GB RAM आणि 256GB किंवा 512GB स्टोरेज मिळते. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50MP चा मेन कॅमेरा, 48MP चा अल्ट्रा वाईड सेन्सर, 12MP ची पोट्रेट लेन्स आणि 5MP ची टेलीफोटो लेन्स मिळते. Vivo X Fold मध्ये दोन सेल्फी कॅमेरे मिळतात एक आतल्या डिस्प्लेवर तर एक बाहेरील डिस्प्लेवर. स्मार्टफोनमध्ये 4600mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 66W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
Vivo X Fold ची किंमत
Vivo X Fold सध्या चीनमध्ये Black, Blue आणि Grey कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. याची किंमत 8,999 युआन (सुमारे 1,07,200 रुपये) पासून सुरु होते. तर मोठ्या व्हेरिएंटसाठी 9,999 युआन (जवळपास 1,19,100 रुपये) मोजावे लागतील. लवकरच हा फोन भारतात येण्याची शक्यता देखील आहे.