विवोचा झेड मालिकेतील पहिला स्मार्टफोन
By शेखर पाटील | Published: May 28, 2018 02:49 PM2018-05-28T14:49:07+5:302018-05-28T14:49:07+5:30
विवो कंपनीने झेड या नवीन मालिकेत झेड १ हा नवीन स्मार्टफोन लाँच केला असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे.
विवो कंपनीने झेड या नवीन मालिकेत झेड १ हा नवीन स्मार्टफोन लाँच केला असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे. विवो कंपनी लवकरच एक्स-२१ हे मॉडेल लाँच करत आहे. याआधीच या कंपनीने झेड १ हे मॉडेल बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. अर्थात हा झेड मालिकेतील पहिला स्मार्टफोन ठरला आहे. यात अलीकडच्या कालखंडात बहुतांश उच्च श्रेणीतील मॉडेल्सप्रमाणे नॉचयुक्त तसेच फुल व्ह्यू या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले फुल एचडी प्लस म्हणजे २२८० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा व तब्बल ६.२८ इंच आकारमानाचा असून यात १९:९ अस्पेक्ट रेशो देण्यात आला आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसर दिलेला आहे. तर याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे.
विवो झेड १ हा स्मार्टफोन ड्युअल कॅमेरा सेटअपने सज्ज आहे. याच्या मागील बाजूस १३ व २ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १२ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. यात स्मार्ट ब्युटी हे विशेष फिचर देण्यात आले आहे. यामध्ये ३२६० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरिओ ८.१ या आवृत्तीवर आधारित फनटच ओएसवर चालणारा आहे. पहिल्यांदा हे मॉडेल चीनमध्ये मिळणार असले तरी लवकरच ते भारतात दाखल होऊ शकते. याचे मूल्य २० हजारांच्या आत असेल अशी शक्यता आहे.