विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या मूल्यासह सर्व फीचर्स
By शेखर पाटील | Published: August 20, 2018 10:42 AM2018-08-20T10:42:20+5:302018-08-20T10:42:52+5:30
विवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे.
विवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात विवो वाय ८३ हा स्मार्टफोन सादर केलेला आहे. याचीच पुढील आवृत्ती विवो वाय ८३ प्रो या मॉडेलच्या माध्यमातून भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विवो कंपनी आपला विवो व्ही ११ हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. मात्र याआधी विवो वाय ८३ प्रो हे मॉडेल ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे.
विवो वाय ८३ प्रो या मॉडेलमध्ये ६.२२ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजे १५२० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. हा डिस्प्ले फुल व्ह्यू २.० या प्रकारातील आहे. याच्या वरील भागात नॉच दिलेला असून यात फ्रंट कॅमेरा आणि अन्य सेन्सर्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामध्ये नेमका कोणता प्रोसेसर असेल याची माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. यामध्ये १३ व २ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्यांचा समावेश असणार आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा हा ८ मेगापिक्सल्सचा आहे.
विवो वाय ८३ प्रो हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो ८.१ या आवृत्तीपासून विकसित केलेल्या फनटच ४.० या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारा आहे. तर यामध्ये ३,२६० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. याचे मूल्य १५,९९० रूपये असून विवोच्या देशभरातील शॉपीजमधून याची अगावू नोंदणी सुरू करण्यात आली आहे. लवकरच याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात येईल असे मानले जात आहे.