व्होडाफोनने ट्रायकडे केली 5G Unlimited ची तक्रार; एअरटेल, जिओने सांगितले 'किती जीबी फ्री'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 08:31 PM2023-12-05T20:31:29+5:302023-12-05T20:32:01+5:30
व्होडाफोन आयडिया अद्याप ५जी सेवा सुरु करू शकलेली नाहीय. एअरटेल, जिओ यांनी सव्वा वर्षापूर्वी फाईव्ह जी सेवा सुरु केली आहे.
व्होडाफोन आयडियाला एअरटेल, जिओची ट्रायकडे तक्रार करणे चांगलेच महागात पडले आहे. तुम्ही स्वत: 4G अनलिमिटेड ऑफर्स देता, मग जिओ, एअरटेलविरोधात तक्रार करण्याचा प्रश्नच येत नाही, अशा शब्दांत ट्रायने व्होडाफोन आयडियाला फटकारले आहे. याचबरोबर जिओ, एअरटेलला अनलिमिटेडबाबत अटी आणि शर्थी जारी करण्यास सांगितले आहे.
व्होडाफोन आयडिया अद्याप ५जी सेवा सुरु करू शकलेली नाहीय. एअरटेल, जिओ यांनी सव्वा वर्षापूर्वी फाईव्ह जी सेवा सुरु केली आहे. या दोन्ही कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना फोरजीच्या रिचार्जवर अनलिमिटेड फाईव्ह जी डेटा ऑफर केला आहे. यावरून या दोन्ही कंपन्या अनलिमिटेड फाईव्ह जी डेटा देण्यावरून ग्राहकांशी खोटे बोलत असल्याची तक्रार व्हीआयने केली होती.
यावरून ट्रायने दोन्ही कंपन्यांना अनलिमिटेड फाईव्ह जी डेटावरून अतिशय स्पष्ट शब्दांत अटी आणि शर्थींची माहिती द्यावी, अशा सूचना केल्या आहेत. दुसऱ्या बाजुला व्होडाफोन आयडियाची तक्रार ट्रायने फेटाळली आहे. व्हीआय स्वत: 4G डेटा ऑफरिंगद्वारे कित्येक प्लॅन जाहीर करत आहे. यामुळे इतर कंपन्यांच्या अनलिमिटेड डेटा ऑफर प्लानवरून तक्रार करण्याचे कारण बनत नाहीय, असे ट्रायचे म्हणणे आहे. याबाबतची बातमी ईटीने दिली आहे.
ट्रायच्या सुचनेनंतर एअरटेलने अनलिमिटेड फाईव्ह जी डेटा बाबत युजरला माहिती देण्यावर भर दिला आहे. अनलिमिटेड फाईव्ह जी म्हणजे ३० दिवसांसाठी अधिकाधिक ३०० जीबी डेटा मोफत दिला जाणार आहे. तर जिओने अनलिमिटेडचा अर्थ अनंत असा नाही, असे स्पष्ट केले आहे.