जिओ-एअरटेलला धोबीपछाड; कॉल क्वॉलिटीत Vi पुन्हा एकदा 'नंबर वन'
By देवेश फडके | Published: January 7, 2021 04:22 PM2021-01-07T16:22:06+5:302021-01-07T16:25:46+5:30
डिसेंबर २०२० मध्ये Vi ची कॉल क्वॉलिटी जिओ आणि एअरटेल यांसह अन्य टेलिकॉम कंपन्यांपेक्षा अतिशय चांगली होती. ट्रायकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली.
नवी दिल्ली : कॉल क्वॉलिटीमध्ये Vodafone Idea (Vi) ने पुन्हा एकदा जिओ आणि एअरटेलला मागे टाकले आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२० मध्ये Vi ची कॉल क्वॉलिटी Jio आणि Airtel यांसह अन्य टेलिकॉम कंपन्यांपेक्षा अतिशय चांगली होती. या यादीत एअरटेल सर्वांत तळात असल्याचे समजते.
TRAI च्या संकेतस्थळावर MyCall नावाचा एक डॅशबोर्ड आहे. या ठिकाणी यासंदर्भातील सर्व माहिती मिळवता येऊ शकते. डिसेंबर २०२० मध्ये केवळ आयडियाला ५ पैकी तब्बल ४.९ गुण मिळाले आहेत. तर व्होडाफोनला ५ पैकी ४.३ गुण मिळाले आहेत. या यादीत व्होडाफोन दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, आताच्या घडीला व्होडाफोन आणि आयडिया एकत्रितपणे Vi ब्रॅण्ड अंतर्गत काम करत आहेत. मात्र, आयडियाच्या ग्राहकांसाठी ही आनंदाची बाब असल्याचे सांगितले जात आहे.
ट्रायकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कॉल क्वॉलिटीच्या यादीत Vi पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. तर BSNL आणि Jio या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांना ५ पैकी ३.९ गुण मिळाले आहेत. BSNL आणि Jio दोन्ही कंपन्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर या यादीत सर्वांत तळात एअरटेल आहे. Airtel ला कॉल क्वॉलिटीसाठी ५ पैकी ३.१ गुण मिळाले आहेत.
युझर्सकडून मिळालेल्या फीडबॅकवरून ट्रायकडून हा डेटा तयार केला जाते. इनडोर कॉल क्वॉलिटीत व्होडाफोनला ४.४ रेटिंग तर, आउटडोरमध्ये ३.८ रेटिंग मिळाले आहे. इनडोर आणि आउटडोर कॉल क्वॉलिटीचे मिळून कंपनीचे सरासरी ४.९ गुण होतात. BSNL ला इनडोर कॉलिंगमध्ये ३.८ रेटिंग आणि आउटडोर कॉल क्वॉलिटीत ४.३ ची रेटिंग युझर्सकडून देण्यात आले आहेत. याप्रमाणे Jio ला इनडोर कॉल क्वॉलिटीत ३.९ रेटिंग देण्यात आली आहे. दरम्यान, नोव्हेंबर २०२० मध्येही Vi ने कॉल क्वॉलिटीत रिलायन्स जिओ आणि एअरटेलला मागे टाकत यादीत प्रथम क्रमांक पटकावला होता.