व्होडाफोन-आयडियाचा ग्राहकांना जोरदार झटका; दंडाची रक्कम वसूल करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 09:21 AM2019-11-19T09:21:17+5:302019-11-19T09:22:00+5:30
2017पासून कंपनीला नफाच झालेला नाही. कंपनीवर 14 अब्ज डॉलरचे कर्ज आहे. जिओच्या आगमनानंतर या कंपनीला मोठा फटका बसला.
नवी दिल्ली : आतापर्यंतच्या ऐतिहासिक तोट्यामध्ये असलेली कंपनी व्होडाफोन- आयडियाने कोट्यवधी ग्राहकांनाच झटका दिला आहे. मागील कराच्या थकबाकीपोटी भारत सरकारने कंपनीला 4 अब्ज डॉलरचा भरणा करण्यास सांगितलेले आहे. नुकत्याच संपलेल्या तिमाहीत कंपनीचा तोटा ५0,९२१ कोटींवर गेला आहे. आता हे नुकसान कंपनी ग्राहकांच्या खिशातून भरून काढणार आहे.
येत्या 1 डिसेंबरपासून कंपनी कॉलचे दर वाढविणार आहे. याचबरोबर अन्य सेवांचेही दर वाढणार आहेत. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार Vodafone-idea ने सांगितले की, आपल्या युजरना जागतिक दर्जाच्या सुविधा सुरु ठेवण्यासाठी कंपनी येत्या 1 डिसेंबरपासून दर वाढविणार आहे. मात्र, कंपनीने किती दर वाढविणार याचा खुलासा केलेला नाही. या निर्णयाचा परिणाम कंपनीच्या तीस कोटी युजरना बसणार आहे.
नुकत्याच संपलेल्या तिमाहीत कंपनीचा तोटा ५0,९२१ कोटींवर गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ४४ हजार २00 कोटी रुपये दूरसंचार मंत्रालयाकडे जमा करायचे असून, यात आणखी १0 हजार कोटी रुपयांची वाढ होऊ शकेल, अशी शक्यता आयसीआयसीआय सिक्युरिटीजने व्यक्त केली आहे.
2017पासून कंपनीला नफाच झालेला नाही. व्होडाफोन-आयडियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनी चालू राहणे हे आता केवळ सरकारच्या मदतीवरच अवलंबून आहे. आर्थिक मदत मिळावी यासाठी कंपनी सरकारसोबत सक्रिय चर्चाही करीत आहे. कंपनीवर 14 अब्ज डॉलरचे कर्ज आहे. जिओच्या आगमनानंतर या कंपनीला मोठा फटका बसला.