लिंक्डइनवर व्हॉईस एसएमएसची सुविधा
By शेखर पाटील | Published: July 30, 2018 12:57 PM2018-07-30T12:57:54+5:302018-07-30T12:58:40+5:30
लिंक्डइनवर व्हॉईस एसएमएस पाठविण्याची सुविधा देण्यात आली असून हे फिचर जगभरातील युजर्सला वापरता येणार आहे.
लिंक्डइनवर व्हॉईस एसएमएस पाठविण्याची सुविधा देण्यात आली असून हे फिचर जगभरातील युजर्सला वापरता येणार आहे. लिंक्डइन हे प्रोफेशनल नेटवर्क मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. अलीकडेच याला मायक्रोसॉफ्टने खरेदी केले असून यात नवनवीन फिचर्स देण्याचा सपाटा लावला आहे. या अनुषंगाने आता लिंक्डइनवर व्हॉईस एसएमएस ही नाविन्यपूर्ण सेवा सुरू करण्यात येत आहे. आजवर लिंक्डइन वापरणार्या युजर्सला इतरांशी संवाद साधतांना मॅन्युअल टायपिंगशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. अनेकदा युजर व्यस्त असतांना आणि विशेष करून प्रवासात असतांना टाईप केलेला मॅसेज पाठविणे तसे जिकरीचे असते. नेमकी हीच समस्या लक्षात घेत आता लिंक्डइनच्या युजर्सला ध्वनीच्या स्वरूपातील संदेशांची देवाण-घेवाण करण्याची सुविधा मिळणार आहे. लिंक्डइनने एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून याबाबत अधिकृत माहिती जाहीर केली आहे.
या ब्लॉग पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे की, लिंक्डइनचे युजर्स आता ध्वनी संदेशांची देवाण-घेवाण करू शकणार आहेत. अशा प्रकारचा संदेश पाठविण्यासाठी कोणत्याही युजरला अॅपवर असणार्या मायक्रोफोनच्या आयकॉनवर क्लिक करावे लागेल. यानंतर यावरून पाठविण्यात येणार्या संदेशाचे रेकॉर्डींग करावे लागेल. सध्या तरी फक्त एक मिनिटांपर्यंतचा मॅसेज या सेवेच्या माध्यमातून पाठविता येणार आहे. या अॅपच्या अँड्रॉइड व आयओएस या दोन्ही प्रणालीच्या युजर्सला हे फिचर येत्या काही दिवसांमध्ये क्रमाक्रमाने अपडेटच्या स्वरूपात प्रदान करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात वेब आवृत्तीवरून व्हाईस एसएमएस पाठविण्याची सुविधा नसली तरी यावरून या प्रकारातील संदेश रिसिव्ह करता येणार आहेत. तर लवकरच वेबवरूनही संदेश पाठविण्याची सुविधा मिळण्याची दाट शक्यता आहे. यामुळे लिंक्डइनवर युजर्सचा एकमेकांशी संवाद वाढण्याची शक्यता आहे. या माध्यमातून लिंक्डइन हे प्रोफेशनल नेटवर्क हळूहळू मॅसेजींगवर लक्ष केंद्रीत करत असल्याचे अधोरेखित झाले आहे.
लिंक्डइने काही दिवसांपूर्वीच आपल्या अॅपची लाईट आवृत्ती दाखल केली आहे. पहिल्यांदा याला भारतात सादर करण्यात आले असून लवकरच ६० देशांमध्ये याला उपलब्ध करण्यात येणार आहे. यातच आता व्हाईस टायपिंगसारखे फिचर लाँच करण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.