व्होटो मोबाईल्स करणार भारतात एंट्री
By शेखर पाटील | Published: August 16, 2017 03:56 PM2017-08-16T15:56:45+5:302017-08-16T15:57:03+5:30
व्होटो मोबाईल्स ही चीनी कंपनी भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी सज्ज झाली असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
भारत आणि चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमिवर देशात अनेक ठिकाणी चीनी मालावर बहिष्कार टाकण्याच्या मोहिमा सुरू झाल्या आहेत. यातील प्रमुख लक्ष्य हे अर्थातच चिनी कंपन्यांचे मोबाईल्स आहेत. मात्र चीनी कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत घट्ट पाय रोवल्याचे दिसून येत आहे. अत्यंत किफायतशीर मूल्यात उत्तमोत्तम फिचर्स असणारे स्मार्टफोन सादर करण्याचा अवलंब या कंपन्यांनी केला आहे. याचा सर्वात मोठा फटका भारतीय स्मार्टफोन उत्पादकांना बसला आहे. यामुळे कधी काळी मायक्रोमॅक्स, इंटेक्स, कार्बन आदी स्मार्टफोन उत्पादक भारतीय मार्केटमध्ये आघाडीवर असले तरी आता त्यांचे स्थान चीनी कंपन्यांनी घेतले आहे. देशात गेल्या वर्षभरापासून सर्वाधीक विक्री होणार्या पहिल्या पाच ब्रँडमध्ये एकही भारतीय कंपनीचा समावेश नाही. तर, यात याच यादीत शाओमी, व्हिव्हो, लेनोव्हो आणि ओप्पो या चिनीकंपन्या आहेत हे विशेष. या पार्श्वभूमिवर, व्होटो मोबाईल्स ही कंपनी आता भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
व्होटो मोबाईल्स ही कंपनी याच महिन्यात तीन स्मार्टफोन भारतात लाँच करणार असून याचे मूल्य दहा हजारांच्या आत-बाहेर असणार आहे. अर्थात अन्य चीनी कंपन्यांप्रमाणे व्होटोदेखील किफायतशीरपणाचा पॅटर्न वापरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय बाजारपेठेत एंट्री करतांना व्होटोने आक्रमक मार्केटींग रणनिती आखल्याचे संकेत मिळाले आहेत. यानुसार व्यापक जाहिरात मोहिमेसह देशभरात विक्रेत्यांचे जाळे उभारण्यात आल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. पहिल्या महिन्यात दीड लाख हँडसेट विक्रीचे उद्दीष्टदेखील ठेवण्यात आले आहे. अलीकडेच कोमिओ कंपनीने भारतात प्रवेशाची घोषणा केली आहे. तर इन्फीनीक्स, आयव्हुमी, टेक्नो या कंपन्या दाखल झाल्या आहेत. यात आता व्होटो मोबाईल्सची भर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात हा भारतीय कंपन्यांसाठी धोक्याचा इशारादेखील मानला जात आहे.