वेगवान इंटरनेटची प्रतीक्षा कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 04:53 AM2020-01-01T04:53:46+5:302020-01-01T04:54:16+5:30
आता ५-जीमुळे विविध उत्पादन आणि सेवाक्षेत्रातदेखील सुपरसॉनिक वेगाने कामे होण्यास मदत होणार आहे.
रशियाने नुकतीच रडारलाही चकवा देऊ शकणाऱ्या अतिवेगवान मिसाइलची चाचणी घेतली. आता ५-जीमुळे विविध उत्पादन आणि सेवाक्षेत्रातदेखील सुपरसॉनिक वेगाने कामे होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे केवळ मोबाइलसेवाच नव्हे, तर कृत्रिम बुद्धिमत्तादेखील (आर्र्टिफिशियल इंटिलिजन्स) आणखी तल्लख होणार आहे. भारतात मात्र, ही सेवा सक्षमपणे चालण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जगभरामधे ५-जी तंत्रज्ञानावरील चाचणी यशस्वी झाली असून, ती काही ठिकाणी प्रायोगिक स्तरावर त्याचा वापरही सुरू झाला आहे. आॅप्टिकल फायबरद्वारे सेवा घेतल्यास संगणकाचा वेग दहा गिगाबाइट (दहा हजार जीबी)पर्यंत जाईल. बँडविड्थ किती असेल, त्यावर हा वेग अवलंबून राहील. लॅपटॉपवर हा वेग चार ते पाच सेकंदांत मिळेल. सर्वोत्तम सेवा असलेल्या ठिकाणी मोबाइलवरदेखील ५ सेकंदापर्यंत हा स्पीड गाठता येईल.
इंटरनेटचा वेग वाढल्याने कृत्रिम बुद्धिमत्ता, आरोग्य सेवा, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, संगीत, रोबोटिक्स, आॅटोमोबाइल क्षेत्र, इन्शुरन्स आणि इतर सेवा आणि उत्पादन क्षेत्रातदेखील आमूलाग्र बदल होतील. वाहनेदेखील अधिक स्मार्टपणे काम करतील. विशेषत: चारचाकी वाहनांमधील कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना मिळेल. पुण्यातील फ्लेम इन्स्टिट्यूटमध्ये तर मानवी मदत न घेता, संगणकावर संगीतनिर्मिती करण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. डॉ. विनोद विद्वंस यांनी संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. रागाचे आरोह-अवरोह, वादी व संवादी स्वर दिले की, संगणक नवी बंदिश तयार करते. विशेष म्हणजे, यात कोणत्याही डाटाबेसचा वापर होत नाही.
सायबरतज्ज्ञ रोहन न्यायाधीश म्हणाले की, सेवा, आॅटोमोबाइल, विमा, रोबोटिक्स अशा विविध क्षेत्रांत ५-जी तंत्रज्ञानामुळे गती येणार आहे. विक्रीपश्चात वाहनसेवा, विमा, आॅटोमोबाइल आणि आॅनलाइन विक्री करणाºया कंपन्यांमध्ये वापरल्या जाणाºया कृत्रिम बुद्धिमत्तेचा वेग यामुळे वाढेल. ग्राहकाची जास्तीतजास्त शंकांचे समाधान ही यंत्रणा करेल. कमीतकमी मानवी हस्तक्षेप असल्याने प्रणालीला वाव मिळेल.
५-जी प्रणाली जगाच्या बाजारपेठेत येत असली, तरी ही सेवा भारतात मिळण्यास विलंब लागेल. आपल्याकडे त्यासाठीची यंत्रणाच अस्तित्वात नसल्याने मोबाइलवरील इंटरनेट
५-जी क्षमतेचे होण्यास वेळ लागेल.
- रोहन न्यायाधीश, सायबरतज्ज्ञ.
सुप्रीम कोर्टाची या क्षेत्राविषयीची एकूणच भूमिका व कंपन्यांचा वाढता तोटा अशा गर्तेत टेलिकॉम उद्योग सापडला आहे. नवी गुंतवणूक मोबाइल क्षेत्रात होत नाही, पण चीनसह काही देशांत मात्र यंदा ५-जी येईल. - दीपक शिकारपूर, संगणकतज्ज्ञ.
काय आहे ४जी-५जी
हवेतून संदेशवहन करणारी वेगवान प्रणाली म्हणून ४-जीकडे पाहिले जाते. आता आपण ५-जीच्या उंबरठ्यावर आहोत. जगामध्ये २०२० मध्ये ५-जी सेवा येत आहे. अत्युच्च क्षमतेच्या रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे फोरजी सेवा वेगवान झाली. सध्या सातशे ते अडीच हजार मेगाहटर््झवर ४-जी सेवा चालते.
त्यामुळे कमीतकमी विलंबाने डाटा पोहोचणे आणि फाइल-व्हिडीओ डाउनलोड करण्याचा वेगही त्यामुळे कमी झाला. ४-जी सेवेमध्ये प्रतिचौरस किलोमीटरमधे ४ हजार वापरकर्त्यांना ४-जी सेवा उत्तम पद्धतीने देता येऊ शकत होती. ५-जीमुळे तब्बल एक दशलक्ष वापरकर्त्यांना ही सेवा देता येईल. एकाच ठिकाणी अधिक वापरकर्ते असल्यास मोबाइल इंटरनेटला तितका वेग मिळत नाही. ही अडचण दूर होईल. इंटरनेट वेगातही वाढ होईल.