वॉचओएस ५ : जाणून घ्या सर्व फिचर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 11:42 AM2018-06-05T11:42:17+5:302018-06-05T11:42:17+5:30
अॅपलने आपल्या 'वर्ल्डवाईड डेव्हलपर्स कॉन्फरन्स'मध्ये वॉचओएस ५ ही स्मार्टवॉचसाठीची अद्ययावत ऑपरेटींग सिस्टीम सादर केली आहे. जगभरात वेअरेबल्स अर्थात परिधान करण्यायोग्य उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यात स्मार्टवॉच, फिटनेस ट्रॅकर आदींचा समावेश आहे. या क्षेत्रातदेखील अॅपलने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या अनुषंगाने अलीकडेच भारतात अॅपल वॉच सेरीज ३ ही मालिका सादर करण्यात आली आहे. अर्थात एकीकडे अद्ययावत उपकरणे सादर करतांना याच्या ऑपरेटींग प्रणालीसही वॉचओएस ५ च्या माध्यमातून अपडेट करण्यात आले आहे. यात अनेक उत्तमोत्तम फिचर्स सादर करण्यात आले आहेत. या वर्षाच्या अखेरीस ही प्रणाली सर्व युजर्ससाठी मोफत अपडेटच्या स्वरूपात उपलब्ध करण्यात येणार आहे.
वॉचओएस ५ या ऑपरेटींग सिस्टीममध्ये वॉकी-टॉकी मोड प्रदान करण्यात आला आहे. याचा वापर करून कुणीही युजर आपल्या स्मार्टवॉचच्या डिस्प्लेवर क्लिक करून वॉकी-टॉकीप्रमाणे तात्काळ आपल्याला हव्या असणार्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. यात वाय-फाय आणि सेल्युलर या दोन्ही नेटवर्कचा सपोर्ट देण्यात आला आहे.
वॉचओएस ५ मध्ये अॅक्टीव्हिटी काँपीटिशन हे अनोखे फिचर देण्यात आले आहे. यात कुणीही अॅपल वॉच असणार्या अन्य युजर्ससोबत विविध अॅक्टीव्हिटीजसाठी स्पर्धा लाऊ शकतो. यात आठवड्यानंतर गुणप्रणालीच्या आधारे कुणाची सरशी झाली हे कळणार आहे. तसेच यात ऑटो-वर्कआऊट डिटेक्शन हे फिचरही देण्यात आले असून याच्या माध्यमातून युजरला त्याने ठरविलेल्या विविध व्यायामांसाठी रिमाईंडर मिळणार आहे. तर नवीन वर्कआऊटमध्ये योगा आणि हायकींगचा समावेश करण्यात आला आहे.
वॉचओएस ५ नवीन रनींग फिचर दिले आहे. यात धावण्याचा व्यायाम करणार्या युजरला त्याच्या अॅक्टीव्हिटीवर लक्ष ठेवता येणार आहे. यात प्रत्येक मिनिटाला कापलेले अंतर, टाकलेली पावले, धावण्याचा वेग आदींची माहिती मिळेल. तसेच युजरने निर्धारीत केलेले अंतर व वेग साधला जातोय की नाही? यावरही लक्ष ठेवले जाणार आहे. याबाबत युजर्सला अलर्टच्या माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे.
वॉचओएस ५ या प्रणालीत युजरला पॉडकास्ट ऐकण्याची सुविधा देण्यात आली आहे. यासाठी युजरला पॉडकास्टच्या कॅटलॉगमधून हवे ते पॉडकास्ट ऐकता येईल. यासाठी सिरी हा व्हाईस कमांडवर आधारित असिस्टंटचा वापरदेखील करता येईल,
या प्रणालीत अॅपलने नुकत्याच जाहीर केलेल्या सिरी वॉचफेसच्या अद्ययावत आवृत्तीचा वापर करू शकतील. यामध्ये शॉटकटचा वापर करता येईल. तसेच युजरच्या दैनंदिन घडामोडींवर लक्ष ठेवून युजरला काय हवे ते सुचविण्यात येईल. याला मॅप्ससोबत संलग्न करण्यात आले आहे. तसेच याला थर्ड पार्टी अॅप्सचा सपोर्टदेखील असेल.
वॉचओएस ५ या प्रणालीत विविध अॅप्सच्या नोटिफिकेशन्सला अधिक उत्तम पध्दतीने मॅनेज करता येणार आहे. यासाठी संबंधीत अॅपला उघडण्याची गरजदेखील पडणार नाही हे विशेष. तर अमेरिकेतील काही विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्याचे ओळखपत्र म्हणूनदेखील अॅपल वॉचचा वापर करण्यात येणार असून यासाठी आवश्यक असणारे फिचर्स या आवृत्तीत देण्यात आले आहे.