टीव्ही पाहताय? जास्त पैसे मोजायची तयारी ठेवा; DTH रिचार्ज महागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 19:18 IST2023-02-06T19:18:17+5:302023-02-06T19:18:28+5:30
नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO) 3.0 चा ग्राहकांवर परिणाम होणार आहे. मात्र, एकाच वेळी किंमत वाढवली जाणार नाही.

टीव्ही पाहताय? जास्त पैसे मोजायची तयारी ठेवा; DTH रिचार्ज महागणार
काही वर्षांपूर्वी तुम्ही जे चॅनल पाहताय त्याचेच पैसे देण्याच्या स्कीमने करोडो भारतीयांचे खिसे रिकामे करण्यास सुरुवात केली होती. ही योजना दिसायला सुंदर होती, परंतू अचानक डीटीएच रिचार्जचे दर दुप्पट झाले होते. आता महागाईने आगडोंब उसळला आहे, असे असताना पुन्हा डीटीएच रिचार्जचे दर वाढणार आहेत.
नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO) 3.0 चा ग्राहकांवर परिणाम होणार आहे. मात्र, एकाच वेळी किंमत वाढवली जाणार नाही. तर दरवाढीचे धक्के थोड्या थोड्या दिवसांनी दिले जाणार आहेत.
ईटीच्या अहवालानुसार, डीटीएच ऑपरेटर ब्रॉडकास्टरने वाढवलेल्या किंमतीचा भार हा ग्राहकांवर टाकला जाऊ शकतो. डीटीएचचे दर एकाच वेळी नाही तर टप्प्याटप्प्याने वाढविल्या जाणार आहेत. एकाच वेळी किंमत वाढल्याने ग्राहक नाराज होऊ शकतात. ग्राहकांच्या रिचार्जमध्ये 25 ते 50 रुपयांची वाढ होणार आहे.
टीव्ही सबस्क्रिप्शनसाठी प्रति वापरकर्ता किंवा ARPU सरासरी कमाई 223 रुपये आहे. टाटा प्लेने 4 ते 6 आठवड्यांत टेरिफ वाढीची घोषणा केली जाणार आहे. ही दरवाढ ५ ते ६ टक्के असू शकते. डीटीएच ऑपरेटर नेटवर्क क्षमता शुल्क किंवा एनसीएफ वाढवत नाहीत. यामुळे एवढी कमी वाढ होणार आहे. ओव्हर-द-टॉप किंवा ओटीटीचे प्रस्थ खूप वेगाने वाढत आहे. डीटीएचचे दर जर वाढले तर ग्राहक ओटीटींकडे वळण्याची शक्यता आहे. कारण आता सर्वच घरांत वेगवान इंटरनेट, स्मार्ट टीव्ही पोहोचले आहेत.