अमेझॉन किंडलची वॉटरप्रूफ आवृत्ती बाजारात दाखल
By शेखर पाटील | Published: October 12, 2017 11:22 AM2017-10-12T11:22:36+5:302017-10-12T11:25:37+5:30
अमेझॉन कंपनीने आपल्या किंडल या ई-रीडरच्या किंडल ओअॅसिसची नवीन आवृत्ती लाँच केली असून हे मॉडेल वॉटरप्रूफ आहे. अमेझॉनच्या किंडल मालिकेतील ई-रीडरला जगभरात उदंड प्रतिसाद लाभला आहे
अमेझॉन कंपनीने आपल्या किंडल या ई-रीडरच्या किंडल ओअॅसिसची नवीन आवृत्ती लाँच केली असून हे मॉडेल वॉटरप्रूफ आहे. अमेझॉनच्या किंडल मालिकेतील ई-रीडरला जगभरात उदंड प्रतिसाद लाभला आहे. या मालिकेतील पहिल्या मॉडेलला १० वर्षे पूर्ण होत असतांना अमेझॉनने किंडल ओअॅसिस या मॉडेलची नवीन आवृत्ती बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. यातील सर्वात लक्ष्यवेधी फिचर म्हणजे हा ई-रीडर आयपीएक्स८ सर्टीफाईड असून तो वॉटरप्रूफ असेल. यामुळे कुणीही अगदी पावसात वा आपल्या बाथरूममध्ये बसून या ई-रीडरवरून विविध ई-बुक्स वाचण्याचा आनंद घेऊ शकणार आहे. यातील दुसरे महत्वाचे फिचर म्हणजे यामध्ये ऑडिबल तंत्रज्ञानाचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामुळे अमेझॉनच्या ऑडिओबुकमधून कोणतेही पुस्तक खरेदी करून ते या ई-रीडरमध्ये ऐकणे शक्य आहे. अमेझॉनवर तब्बल ३.७५ लाख ऑडिओबुक्स आणि अन्य ऑडिओ कार्यक्रमांचा खजिना असून युजर यातून आपल्याला हवे ते कंटेंट निवडू शकेल. अलीकडच्या काळात ध्वनी आज्ञावलीवर आधारित व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. यात कुणीही व्हाईस कमांडच्या आधारे हव्या त्या बातम्या आणि अन्य मनोरंजनपर कार्यक्रम ऐकू शकतो. यामुळे अमेझॉननेही ऑडिओबुकच्या माध्यमातून याच प्रकारची सुविधा दिल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
नवीन किंडल ओअॅसिस मॉडेलमध्ये अन्य फिचर्सदेखील उत्तम दर्जाचे आहेत. यातील डिस्प्ले ७ इंच आकारमानाचा आणि ३०० पीपीआय क्षमतेचा आहे. अगदी प्रखर सूर्यप्रकाशातही यावरून वाचन करतांना डोळ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नसल्याचा अमेझॉन कंपनीचा दावा आहे. मोठा डिस्प्ले असल्यामुळे याच्या प्रत्येक पानावर ३० टक्के जास्त शब्द मावतात. परिणामी कोणत्याही ई-बुकमधील पानांची संख्या कमी होणार असल्याचे अमेझॉनने आवर्जून नमूद केले आहे. हे मॉडेल अतिशय स्लीम असून याच्या मागील भागाला अॅल्युमिनियमचे आवरण असेल. तर याचे वजन अवघे १९४ ग्रॅम असल्यामुळे हा ई-रीडर सोबत वागवण्यात कोणतीही अडचण भासत नाही. यात ब्ल्यु-टुथ व वाय-फायसह सेल्युलर कनेक्टिव्हिटीदेखील प्रदान करण्यात आली आहे. नवीन किंडल ओअॅसिस हा ई-रीडर ८ जीबी आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेजच्या दोन पर्यायांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. यांचे मूल्य मूल्य २४९ डॉलर्स असेल.