वेअरेबल्सच्या बाजारपेठेत उसळी; १७ टक्क्यांनी वाढणार विक्री
By शेखर पाटील | Published: August 25, 2017 11:13 AM2017-08-25T11:13:59+5:302017-08-25T11:15:54+5:30
वेअरेबल्स म्हणजेच परिधान करण्याजोग्या उपकरणांच्या विक्रीत उसळी येणार असल्याचे संकेत असून फक्त २०१७मध्ये यात १७ टक्के वाढ होणार असल्याचे गार्टनर या ख्यातप्राप्त संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जागतिक बाजारपेठेत सध्या स्मार्टफोन हे हॉट केक सारखे विकले जात आहे. यामुळे प्रत्येक दिवसाला कोणती तरी कंपनी नवनवीन मॉडेल लाँच करतांना आपल्याला दिसून येत आहे. तथापी, लवकरच स्मार्टफोनची बाजारपेठ स्थिर होण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेत टेक कंपन्यांनी स्मार्टफोनच्या पलीकडे पाहण्यास प्रारंभ केला आहे. यात वेअरेबल्स म्हणजेच शरिरावर परिधान करण्यायोग्य उपकरणे महत्वाची भूमिका बजावणार असल्याची भाकिते काही वर्षांआधीच करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गार्टनर या संस्थेने ताज्या अहवालात वेअरेबल्स उपकरणांच्या क्षेत्रात प्रचंड तेजी आल्याचे नमूद केले आहे.
गार्टनर संस्थेच्या अहवाल २०१७ मध्ये एकंदरीत सुमारे ३१ कोटी वेअरेबल्स उपकरणांची विक्री होण्याची शक्यता असून ही तब्बल ३०.५ अब्ज डॉलर्सची उलाढाल असणारी बाजारपेठेत बनणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यासाठी आजवर २०१७ मध्ये झालेली विक्री आणि उत्पन्नाच्या आकड्यांना आधारभूत मानण्यात आले आहे. यामुळे ही शक्यता जवळपास प्रत्यक्षात उतरण्याचे संकेत आहेत. गार्टनरच्या अहवालात स्मार्टवॉच हे सर्वात लोकप्रिय वेअरेबल्स असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या पाठोपाठ हेड माऊंटेड डिस्प्ले (स्मार्ट गॉगल्स आदी), फिटनेस ट्रॅकर, ब्ल्यु-टुथ हेडसेट, रिस्ट बँड, स्पोर्टस् वॉच आदी उपकरणांच्या विक्रीतदेखील वाढ झाली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे बालकांसाठीचे स्मार्टफोन, जीपीएस ट्रॅकर आदींची लोकप्रियताही वाढत आहे.
वेअरेबल्स उपकरणांमध्ये स्मार्टवॉचमध्ये सर्वाधीक उलाढाल होत असल्याचे गार्टनरने अधोरेखित केले आहे. यात अॅपल, सॅमसंग, एलजी आदी उत्पादक आघाडीवर आहेत. पुढील महिन्यात अॅपल कंपनी आपले नवीन स्मार्टवॉच लाँच करणार असून यात फोर-जी नेटवर्क सपोर्टला सिरी हा ध्वनी आज्ञावलीवर चालणार्या असिस्टंटची जोड देण्यात येईल असे संकेत मिळाले आहेत. यातून व्हाइस कमांडवर आधारित वेअरेबल्समध्ये नवीन अध्याय सुरू होईल असे मानले जात आहे. यासोबत अन्य कंपन्यादेखील याच प्रकारे उत्तमोत्तम उपकरणे सादर करू शकतात. गुगलने अलीकडेच आपल्या गुगल ग्लास या उपकरणाचे पुनरूज्जीवन केले आहे. तर स्नॅपचॅटसारख्या कंपन्यांनीही स्मार्ट ग्लासेस सादर केले आहेत. याचा विचार करता लवकरच अन्य कंपन्याही स्मार्ट गॉगल्सकडे वळण्याची शक्यता आहे. तर फिटनेस ट्रॅकर/बँड अल्प मूल्यात उपलब्ध होत असून यात नवनवीन फिचर्स देण्यात येत आहेत. याशिवाय अद्याप वस्त्र-प्रावरणांमध्ये कनेक्टिव्हिटी प्रदान करणारे प्रॉडक्ट फारसे चर्चेत नसले तरी येत्या काळात तेदेखील बाजारपेठेत धमाल करू शकतात असे गार्टनरने नमूद केले आहे.