'OTP फ्रॉड'पासून असा करा बचाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 12:55 PM2019-08-11T12:55:10+5:302019-08-11T13:03:32+5:30

बँकांच्या नावे अनेकदा खोटे कॉल करून ओटीपी नंबर मिळवला जातो. त्यानंतर त्याचा गैरवापर करून लाखोंचा गंडा घातल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

what are otp frauds and how can you save yourself from such cases | 'OTP फ्रॉड'पासून असा करा बचाव

'OTP फ्रॉड'पासून असा करा बचाव

Next
ठळक मुद्देबँकांच्या नावे अनेकदा खोटे कॉल करून ओटीपी नंबर मिळवला जातो. वन टाइम पासवर्ड (OTP) च्या माध्यमातून अनेकांची फसवणूक होते. ओटीपी कोणाशीही शेअर करू नये, अशी सुचना युजरला अनेकदा दिली जात असते.

नवी दिल्ली - सध्याचा जमाना हा ऑनलाईनचा आहे. खरेदीपासून ते बिल भरण्यापर्यंतचे अनेक व्यवहार हे ऑनलाईनच केले जातात. कॅशलेस व्यवहारांना अधिक पसंती दिली जाते. त्यामुळेच भारतात डिजिटल पेमेंट पद्धतीने व्यवहार करण्यास प्राधान्य दिलं जात आहे. मात्र ऑनलाईन व्यवहार करताना अथवा डिजीटल पेमेंट करताना अनेकदा फसवणूक होण्याची शक्यता ही अधिक असते. आपला ओटीपी, पासवर्ड कोणालाही सांगू नका असे मेसेज हे बँकांकडून सातत्याने ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी येत असतात. 

बँकांच्या नावे अनेकदा खोटे कॉल करून ओटीपी नंबर मिळवला जातो. त्यानंतर त्याचा गैरवापर करून लाखोंचा गंडा घातल्याच्या घटना समोर आल्या आहेत.  वन टाइम पासवर्ड (OTP) च्या माध्यमातून अनेकांची फसवणूक होते. ऑनलाईन अथवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर पेमेंट करताना सुरक्षेच्या कारणास्तव युजर्सच्या मोबाईलवर ओटीपी अर्थात वन टाइम पासवर्ड पाठवला जातो. हा पासवर्ड कन्फर्म केला, तरच व्यवहार पूर्ण होतो. म्हणूनच ओटीपी कोणाशीही शेअर करू नये, अशी सुचना युजरला अनेकदा दिली जात असते. काही वेळा नव्याने डिजिटल व्यवहार करणाऱ्या लोकांकडून ओटीपीची माहिती काढली जाऊन फसवणूक केली जाते. यालाच OTP फ्रॉड असं म्हणतात. 

OTP फ्रॉड पासून असा करा बचाव

ओटीपी कोणालाही सांगू नका

व्यवहार करताना आलेला ओटीपी कधीही कोणालाही सांगू नका. अनेकदा युजरचं खातं असलेल्या बँकेत ओटीपी हवा आहे, असं खोटं सांगणारे फोन येतात. मात्र अशा पद्धतीने कधीही ओटीपी मागत नसल्याने तो कोणासोबतही शेअर करू नका. 

पेमेंट करताना काळजी घ्या

ओटीपी फ्रॉडपासून वाचण्यासाठी पेमेंट करताना किती रुपये खर्च करतोय याकडे लक्ष द्या. ज्या पेजवर ओटीपी टाकला आहे, त्या पेजचा सोर्स आणि मर्चंट विश्वसनीय आहे ना, याची नीट खात्री करून घ्या. पेमेंट करताना काही चुकीचं वाटलं तर ते रद्द करा. 

पैसे स्विकारताना ओटीपी लागत नाही

ओटीपी फक्त पैसे देताना लागतो. पैसे स्विकार करणाऱ्या माणसाला ओटीपीची गरज पडत नाही. अनेकदा नव्या युजरला पाठवलेले पैसे स्विकारण्यासाठी ओटीपी लागतो असं सांगितलं जातं.  मात्र, जो युजर पैसे पाठवणार आहे, फक्त त्याच्याच मोबाईल नंबरवर ओटीपी येतो, हे नेहमी लक्षात ठेवावे. 

स्मार्टफोनवर अधिकृत स्रोतांचाच वापर करा 

फ्रॉड करणारे अनेकदा स्मार्टफोन अ‍ॅप्सच्या मदतीने युजर्सचा ओटीपी आणि कार्डचा नंबर चोरतात. त्यामुळे व्यवहार करताना फक्त अधिकृत अ‍ॅप्स किंवा वेबसाईटचाच वापर करावा

अधिकृत कस्टमर केअरशीच संपर्क करावा 

बँक खाते किंवा डिजिटल व्यवहारासंबंधी काहीही तक्रार असल्यास नेहमी अधिकृत कस्टमर केअरशीच संपर्क करावा. त्यांना कॉल करून त्याबाबत विचारा. अनाधिकृत नंबरशी संपर्क झाल्यास डाटा चोरी केला जाऊ शकतो. अनेक वेळा गुगलवर खोटे कस्टमर केअर नंबर लिहिलेले असतात. 

 

Web Title: what are otp frauds and how can you save yourself from such cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.