काय सांगताय.... रोबोट येणार, शिक्षक जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 08:13 PM2018-08-22T20:13:06+5:302018-08-22T20:14:22+5:30
चीनमध्ये शिक्षक, डॉक्टर आणि सैनिकांचे काम करणारे रोबोट
टोकियो, बिजिंग : जपानमधील शाळांमध्ये इंग्रजी शिकविण्यासाठी अस्खलित इंग्रजी येणाऱ्या शिक्षकाला नोकरीवर ठेवणे शक्य होत नाही. यामुळे तेथील शाळांमध्ये चीनने बनविलेले रोबोट मुलांना इंग्रजी बोलायला शिकवणार आहेत. चीनमध्ये नुकतेच जागतिक रोबोट सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिक्षक, डॉक्टर आणि सैनिकांचे काम करणारे रोबोट ठेवण्यात आले होते.
जपानमधील शाळांना इंग्रजी शिकविण्याची सक्ती करण्यात आली आहे. मात्र, प्रत्येक शाळेला इंग्रजी शिकविण्यासाठी स्वतंत्र शिक्षक ठेवणे परवडणारे नाही. यामुळे सरकारने रोबोटद्वारे मुलांना इंग्रजी शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रायोगिक तत्वावर 500 रोबोट चीनकडून घेण्यात येणार आहेत. तसेच इंग्रजी शिकविणारे अॅपही आणण्यात येणार आहेत. जपानमधील मुले इंग्रजी लिहिण्या, बोलण्यात कमजोर असतात. यामुळे पुढील दोन वर्षांत या मुलांना इंग्रजीमध्ये पारंगत बनविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
चीनमध्ये रोबोटच्या मदतीने अनेक कामे केली जात आहेत. इथपर्यंत की फॅक्टरीपासून रेस्टराँ, बँक , पार्सल पोहोचविण्याची कामेही रोबोट करत आहेत. कहर म्हणजे चीनने जवळपास 150 आजार ओळखून रुग्णावर उपचार करणारा डॉक्टर रोबोही विकसित केला आहे. या रोबोटने चीनची राष्ट्रीय वैद्यकीय परिक्षाही पास केली आहे. हे रोबोट डॉक्टरांना ऑपरेशनवेळी मदतही करत आहेत. हे रोबोट एक्स-रे रिपोर्टही पाहून विश्लेषन करत आहेत.
यामुळे मात्र, प्रत्येक क्षेत्रातील रोजगारांवर संकटाचे ढग दाटू लागले आहेत.