व्हाटसअॅपवर स्टेटस् अधिक आकर्षक पध्दतीने अपडेट करण्याची सुविधा
By शेखर पाटील | Published: August 23, 2017 05:00 PM2017-08-23T17:00:00+5:302017-08-23T17:00:00+5:30
व्हाटसअॅपने आता अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालीच्या युजर्ससाठी रंगीत स्टेटस अपडेट करण्याची सुविधा केली असून युजर्सला क्रमाक्रमाने ही सुविधा मिळत आहे.
व्हाटसअॅपने आता अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालीच्या युजर्ससाठी रंगीत स्टेटस अपडेट करण्याची सुविधा केली असून युजर्सला क्रमाक्रमाने ही सुविधा मिळत आहे.
गेल्या वर्षी व्हाटसअॅपवर व्हिडीओ वा जीआयएफ अॅनिमेशनला स्टेटस म्हणून वापरता येण्याची चुणूक मिळाली होती. यानंतर या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात हे फिचर देण्यात आले होते. याच्या अंतर्गत कुणीही व्हिडीओ, इमेज वा जीआयएफ अॅनिमेशनच्या स्वरूपात स्टेटस अपडेट करण्याची सुविधा देण्यात आली. संबंधीत स्टेटस हे २४ तासानंतर आपोआप नष्ट होते. अर्थात हे फिचर स्नॅपचॅट या लोकप्रिय स्मार्टफोन अॅप्लीकेशनच्या ‘स्टोरीज’ या फिचरची हुबेहूब नक्कल असल्याचे स्पष्ट झाले होते. आपल्या इमेज गॅलरीतल्या व्हिडीओ अथवा अॅनिमेटेड इमेजला अशा पध्दतीने स्टेटस म्हणून वापरता येते. याला इमोजी अथवा अन्य रेखाटनाने सुशोभित करता येते. याशिवाय कुणीही आपल्या स्मार्टफोनच्या कॅमेर्यातूनही फोटो वा व्हिडीओ काढून तो अपलोड करू शकतो. या नवीन फिचरसाठी कॉल आणि चॅट यांच्या मध्ये ‘टॅब’च्या रूपाने स्वतंत्र भाग देण्यात आला आहे. आता हे स्टेटस अधिक आकर्षक होण्याचे संकेत मिळाले आहेत.
व्हाटसअॅपच्या काही युजर्सला ‘स्टेटस्’ या विभागात जाऊन क्लिक केल्यानंतर कॅमेर्याच्या जवळ पेनाच्या आकाराचा आयकॉन दिसू लागला आहे. यावर क्लिक केल्यानंतर युजरला रंगीत शब्द आणि रंगीत पार्श्वभागांनी युक्त असणारे स्टेटस अपडेट करता येते. काही युजर्सला हे फिचर दिसू लागले आहे. तर अन्य युजर्सला अपडेटच्या स्वरूपात याला सादर करण्यात येणार आहे. तर आधीच्या स्टेटस्प्रमाणेच यातही प्रायव्हसी सेटींगची सुविधा देण्यात आली आहे. अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींच्या युजर्सला ते वापरता येईल.
फेसबुकने आधीच आपल्या स्टेटसचा पार्श्वभाग तसेच अक्षरे रंगीत करण्याचे फिचर देण्यात आले आहे. आता व्हाटसअॅपही याच मार्गावरून जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे व्हाटसअॅपच्या वेब आवृत्तीवरही अलीकडेच स्टेटस्ची सुविधा देण्यात आली होती. हे नवीन फिचर डेस्कटॉपवरही मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.