पर्सनल गॅजेटमध्ये नवीन काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 04:51 AM2020-01-01T04:51:39+5:302020-01-01T04:51:50+5:30

अन्न, वस्त्र, निवारा, यानंतर तंत्रज्ञान ही जगण्याची मूलभूत गरज, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

What's New in Personal Gadgets? | पर्सनल गॅजेटमध्ये नवीन काय?

पर्सनल गॅजेटमध्ये नवीन काय?

Next

अन्न, वस्त्र, निवारा, यानंतर तंत्रज्ञान ही जगण्याची मूलभूत गरज, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. सकाळी आपल्याला झोपेतून उठविण्यापासूनच पर्सनल गॅजेट आपली साथ देऊ लागले आहेत. मोबाइलमध्ये अलार्मपासून ते आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या अलेक्सा किंवा गुगल असिस्टंटसारख्या फीचरपर्यंत सर्व काही पर्सनल गॅजेटमध्ये सामावलेले असते. त्यामुळेच २०२० हे नवे वर्षही अनेक नव्या गॅजेट्सची भेट देणारे ठरणार आहे.

ब्लू टूथ स्पीकर, स्मार्टवॉच, फिटनेस बँड अशा अनेक गॅजेटची बाजारात सध्या रेलचेल पाहायला मिळत आहे. कनेक्टिव्हिटीच्या साहाय्याने एकाच पर्सनल गॅजेटला इतर सर्व गॅजेट जोडली जातात. त्यामुळे एकाच गॅजेटच्या माध्यमातून ‘मल्टिटास्किंग’ करणे सोपे जाते. अ‍ॅपल, फॉसिल, एमआय, फिटबिट सारख्या अनेक कंपन्यांची अद्ययावत स्मार्टवॉच नवीन वर्षात बाजारात नवी फीचर्स घेऊन दाखल होणार आहेत. स्मार्ट गॅजेट खरेदी करताना वॉरंटी, एक्स्टेंडेड वॉरंटी, क्वालिटी अशा अनेक निकषांचा विचार करावा लागतो. गॅजेट खरेदी करताना चेकलिस्ट, रिव्ह्यू, कंपनीची विश्वासार्हता, मॅन्युफॅक्चरिंग या गोष्टींची खात्री करून घ्यायला हवी.

नव्या वर्षात स्मार्टवॉचप्रमाणेच दररोजचे आयुष्य सोपी करणारी अनेक गॅजेट्स बाजारात दाखल होत आहेत. अ‍ॅपल कंपनीतर्फे एकोबीट हे वायरलेट हेडफोनचे नवे व्हर्जन बाजारात येत आहे. कारच्या इंजिनमध्ये काही बिघाड असेल, तर ते दाखविणारे फिक्स्ड हे नवीन गॅजेट खास आकर्षण ठरेल. कारच्या इंजिनमधील संभाव्य बिघाड लक्षात घेऊन या गॅजेटमध्ये वॉर्निंग लाइट लागू शकेल. ड्रोन एक्स (पर्सनल फोटोग्राफर गॅजेट), टॅपएनचार्ज (वायरलेस चार्जिंग पॅड), आयट्रॅक (कार जीपीएस ट्रॅकर), इलेक्ट्रिक टूथब्रश, ट्रान्सलेशन असिस्टंट असे अनेक गॅजेट ‘नेक्स्ट जेन’ म्हणून ओळखले जात आहेत.

‘लोकमत’शी बोलताना संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, ‘गॅजेटच्या बाबतीत सध्या अ‍ॅपल आणि सॅमसंगमध्ये स्पर्धा सुरू आहे. गुगलही या स्पर्धेत उतरले आहे. ट्रॅकर्स, पर्सनल सिक्युरिटी गॅजेट्स, अलर्ट गॅजेट असे वैविध्य मार्केटमध्ये उपलब्ध आहे. कधी आणि कोणते गॅजेट वापरायचे, याचे भान पाळणेही अवघड आहे. एकाच वेळी अनेक गॅजेट वापरणेही अडचणीचे ठरू शकते. सध्या स्मार्ट फोन हे एकच पर्सनल गॅजेट मला उपयुक्त वाटते. टॅब्लेटची ८० टक्के फीचर्स स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहेत. स्मार्ट गॅजेटबद्दल कमालीचे आकर्षण वाटत असले, तरी ती खूप महागडी आहेत. त्यांची किंमत ५०,००० रुपयांच्या पुढे आहेत. गॅजेटमध्ये सातत्याने नवीन टेक्नॉलॉजी, नवे व्हर्जन येत असल्याने एकदा खरेदी केलेले गॅजेट दोन वर्षांत आउटडेटेड होते. त्यामुळे यासाठी किंमत किती मोजायची, हा वैयक्तिक प्रश्न आहे. बाजारात आलेले प्रत्येक गॅजेट आपण वापरलेच पाहिजे, असे नाही. यापेक्षा आपल्याकडे असलेल्या गॅजेटचा जास्तीतजास्त वापर कसा करता येईल, याकडे लक्ष द्यायला हवे. स्मार्टफोनमधील ६० टक्के फीचर्सही आपण वापरत नाही. विविध अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करून, त्यांचा अभ्यास करून उपयुक्तता लक्षात येऊ शकते.’

Web Title: What's New in Personal Gadgets?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.