व्हॉट्सॲप अन् इन्स्टाग्राम विकले जाणार; ‘मेटा’च्या विरोधातील खटला एफटीसीने जिंकला!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 10:38 AM2022-01-15T10:38:43+5:302022-01-15T10:38:58+5:30
‘मेटा’ला आपले लोकप्रिय ॲप्स व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम विकावे लागू शकतात, असे बोलले जात आहे.
नवी दिल्ली : मार्क झुकेरबर्ग याच्या मालकीच्या फेसबुकची मातृ कंपनी ‘मेटा’च्या विरोधातील एकाधिकारशाहीचा (अँटीट्रस्ट) एक खटला अमेरिकेची व्यापारविषयक संस्था ‘फेडरल ट्रेड कमिशन’ने (एफटीसी) जिंकला आहे. त्यामुळे ‘मेटा’ला आपले लोकप्रिय ॲप्स व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम विकावे लागू शकतात, असे बोलले जात आहे.
काय आहे आरोप?
- एफटीसी ही अमेरिकी सरकारची स्वतंत्र संस्था असून, ती ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्याचे काम करते.
- मेटा’ने व्यावसायिक स्पर्धेला सुरुंग लावून एकाधिकारशाही निर्माण केल्याचा एफटीसीचा आरोप आहे.
- मेटाने व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम हे दोन ॲप विकावे, असे एफटीसीचे म्हणणे आहे.
- त्यासाठी एफटीसी मेटाविरुद्ध खटला दाखल करू शकते, असे सुत्रांनी सांगितले.
स्पर्धेच्या नियमांचे उल्लंघन
- व्यावसायिक स्पर्धेच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली एफटीसीने मेटाविरोधात खटला चालविण्यासाठी गेल्या वर्षीच न्यायालयात अर्ज केला होता.
- तथापि, तपशिलांअभावी तो फेटाळला गेला होता. एफटीसीने पुन्हा हा अर्ज दाखल केला.
- फेडरल न्यायाधीशांनी यावेळी एफटीसीचे म्हणणे ग्राह्य धरून मेटाविरुद्ध खटला चालविण्याची परवानगी दिली आहे.
फेसबुकची एकाधिकारशाही
- जिल्हा न्यायाधीश जेम्स बोसबर्ग यांनी म्हटले आहे की, एफटीसीकडे पुरेसे पुरावे आहेत.
- मेटाने सामाजिक नेटवर्किंग क्षेत्रात एकाधिकारशाही निर्माण केल्याचे त्यावरून सिद्ध होईल.
- २०१६ नंतर मेटाच्या दैनंदिन सक्रिय वापरकर्त्यांची संख्या ७० टक्के आहे, असे एफटीसीने सादर केलेल्या कॉमसोर्स डेटावरून दिसून येत आहे.
- एफटीसीचा खटला रद्द करण्याची विनंती करणारा अर्ज मेटाने सादर केला होता. तथापि, न्यायालयाने तो फेटाळून लावला आहे.