लै भारी! WhatsApp वर निवडक लोकांपासून लपवता येणार प्रोफाइल पीक, लास्ट सिन आणि स्टेटस
By सिद्धेश जाधव | Published: September 30, 2021 11:56 AM2021-09-30T11:56:56+5:302021-09-30T11:57:05+5:30
WhatsApp New Privacy Settings: व्हॉट्सअॅपवर युजर्स आता निवडक कॉन्टॅक्ट्सपासून लास्ट सीन, स्टेटस, प्रोफाईल पिक्चर आणि स्टेटस लपवून ठेऊ शकतात. सध्या टेस्टिंगमध्ये असलेले हे फिचर लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होईल.
व्हॉट्सअॅपवर इन्स्टंट मेसिजिंग अॅपचा अनुभव सुखकर करण्यासाठी सतत नवनवीन फीचर्स सादर करण्यात येत असतात. तसेच कंपनी जुन्या फीचर्समध्ये बदल करत असते. आता व्हॉट्सअॅप अँड्रॉइड बीटा युजर्ससाठी एक नवीन कस्टम प्रायव्हसी सेटिंगवर काम करत आहे. या सेटिंगचा वापर करून युजर्स निवडक लोकांपासून आपले स्टेटस, लास्ट सीन आणि प्रोफाईल फोटो लपवून ठेऊ शकतात.
लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचे नवीन प्रायव्हसी फीचर्स काही दिवसांपूर्वी आयओएसवरील बीटा अॅपवर दिसले होते. तर आता व्हॉट्सअॅपच्या अँड्रॉइड व्हर्जनवर देखील या फिचरची टेस्टिंग होत असल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती व्हॉट्सअॅपच्या नव्या फीचर्सवर बारकाईने लक्ष ठेवणाऱ्या Wabetainfo या टेक वेबसाईटने दिली आहे.
व्हॉट्सअॅपवरील नवीन प्रायव्हसी सेटिंग्स
रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपवर युजर्स आता निवडक कॉन्टॅक्ट्सपासून लास्ट सीन, स्टेटस, प्रोफाईल पिक्चर आणि स्टेटस लपवून ठेऊ शकतात. सध्या टेस्टिंगमध्ये असलेले हे फिचर लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होईल. आतापर्यंत व्हॉट्सअॅप लास्ट सीन, प्रोफाईल पिक्चर, अबाउटसाठी प्रायव्हसी सेटिंग्समध्ये कॉन्टॅक्टस वगळण्याचा पर्याय नव्हता, लवकरच हा पर्याय दिसू लागेल.
या नव्या फीचरचा वापर करून तुम्ही अशा कॉन्टॅक्टची निवड करू शकता ज्यांना तुम्हाला तुमचा फोटो किंवा लास्ट सिन इत्यादी दाखवायचे नाहीत. जे लोक आपले खाजगी आयुष्य खाजगी ठेऊ इच्छितात त्यांच्यासाठी हे फिचर खूप उपयुक्त ठरू शकते. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार व्हॉट्सअॅपवर आता लास्ट सीनमध्ये युजर्सना ‘My contacts except…’ ऑप्शन मिळेल. सध्या लास्ट सीन कस्टमाइज करण्यासाठी Everyone, My contacts आणि Nobody असे तीनच पर्याय मिळत आहेत.