WhatsApp वर मेसेज पाठवल्यानंतरही तुम्ही Edit करू शकणार, लवकरच येणार नवीन फीचर!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 01:03 PM2022-06-01T13:03:26+5:302022-06-01T13:12:32+5:30
WhatsApp Update : सध्या व्हॉट्सअॅपवर पाठवलेले मेसेज डिलीट केले जाऊ शकतात, पण एडिट केले जाऊ शकत नाहीत, मात्र या आगामी फीचरमुळे यूजर्स पाठवल्यानंतर मेसेज एडिट करू शकतील.
WhatsApp Update : गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपमध्ये नव-नवीन फीचर्स येत आहेत. आता कंपनी व्हॉट्सअॅपमध्ये एडिट बटण हे फीचर आणणार आहे. अॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये एडिट बटणाची टेस्टिंग करत आहे.
सध्या व्हॉट्सअॅपवर कोणतेही एडिट बटण नाही. तसेच, सध्या व्हॉट्सअॅपवर पाठवलेले मेसेज डिलीट केले जाऊ शकतात, पण एडिट केले जाऊ शकत नाहीत, मात्र या आगामी फीचरमुळे यूजर्स पाठवल्यानंतर मेसेज एडिट करू शकतील. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप मेसेज रिअॅक्शन फीचरनंतर आता व्हॉट्सअॅप टेक्स्ट मेसेज एडिटिंग फीचर देत आहे, जे आगामी अपडेटसह सादर केले जाऊ शकते.
WABetaInfo ने एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, त्यामध्ये असे दिसते की, व्हॉट्सअॅप एक नवीन ऑप्शन विकसित करत आहे, ज्यामुळे मेसेज एडिट करता येईल. याच्या मदतीने युजर्स मेसेज पाठवल्यानंतरही त्यांची चूक सुधारू शकतील, परंतु हे फीचर सध्या विकसित केले जात आहे. त्यामुळे याचा अर्थ असा होतो की आगामी काळात काही बदल देखील होऊ शकतात. याचबरोबर, व्हॉट्सअॅप हे फीचर सर्व अँड्रॉइड बीटा, आयओएस बीटा आणि डेस्कटॉपसाठी काम करत आहे, असे समजते. मात्र, या फीचरबद्दल यापेक्षा जास्त माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, अलीकडेच मेसेजिंग अॅपवर पेमेंट फीचर सादर करण्यात आले आहे. दरम्यान, अॅपने व्हॉट्सअॅप पेमेंट्स (WhatsApp Payments)फीचर्सच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी कॅशबॅक देणे सुरू केले आहे. जे युजर्स आपल्या मित्रांना किंवा कुटुंबियांना व्हॉट्सअॅप पेमेंटद्वारे पैसे पाठवतात, त्यांना कंपनी 35 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. मात्र, हा कॅशबॅक केवळ तीन वेळा आणि तीन वेगवेगळ्या नंबरवर पैसे पाठवल्यास मिळणार आहे.