व्हॉट्स अॅपनं आणलं ग्रुप कॉलिंग फीचर; असा करा नव्या सेवेचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 04:40 PM2018-07-31T16:40:52+5:302018-07-31T20:23:22+5:30
आजपासून नव्या सेवेची सुरुवात
मुंबई: व्हॉट्स अॅपनं आजपासून ग्रुप व्हिडीओ कॉलिंग फिचर सुरू केलं आहे. याआधी व्हॉट्स अॅपनं ऑडिओ कॉलिंग फिचर सुरू केलं होतं. आता ग्रुप व्हिडीओ कॉलिंग फिचर सुरू करत व्हॉट्स अॅपनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. डेव्हलपर कॉन्फरन्स एफ8 मध्ये कंपनीनं याबद्दलची घोषणा केली होती.
आजपासून ग्रुप व्हिडीओ कॉलिंग फिचर लाईव्ह करण्यात आल्याचं व्हॉट्स अॅपनं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता जगभरातील आयओएस आणि अँड्रॉईड युजर्स या नव्या सुविधेचा वापर करु शकतात. व्हॉट्स अॅप ग्रुप कॉलिंगच्या माध्यमातून एकाच वेळी चार व्हॉट्स अॅप युजर्स व्हिडीओ चॅट करु शकतात. ग्रुप कॉलिंगची सुविधा व्हॉट्स अॅपवर आजपासून सुरू झाली असली, तरी हे फिचर नवं नाही. अनेक अॅप्समधून ग्रुप व्हिडीओ कॉलिंग करता येतं.
ग्रुप व्हिडीओ कॉलिंग सुविधा वापरण्यासाठी इंटरनेटचा वेग जास्त असावा लागतो. मात्र व्हॉट्स अॅपवरुन ग्रुप व्हिडीओ कॉलिंग करण्यासाठी हायस्पीड इंटरनेटची आवश्यकता भासणार नाही, असं व्हॉट्स अॅपनं जाहीर केलं आहे. हे व्हिडीओ कॉल एन्ड टू एन्ड एनक्रिप्टेड असतील, असं कंपनीनं म्हटलं आहे. व्हॉट्स अॅप ग्रुप व्हिडीओ कॉलिंगची सुरुवात करण्यासाठी युजरला एका व्यक्तीला व्हिडीओ कॉल करावा लागेल. यानंतर तुम्ही आणखी दोघांना कॉलमध्ये अॅड करु शकता. यामुळे स्काईपसारख्या व्हिडीओ कॉलिंग प्लॅटफॉर्म्सना टक्कर मिळण्याची शक्यता आहे. व्हॉट्स अॅपच्या वापरकर्त्यांची संख्या प्रचंड आहे. जगातील 150 कोटी लोक व्हॉट्स अॅपचा वापर करतात.