कटकटच संपणार! तुमचं 'लास्ट सीन' आता 'त्यांना' नाही दिसणार; व्हॉट्स ऍप भन्नाट फीचर आणणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 17:16 IST2022-04-18T17:15:56+5:302022-04-18T17:16:12+5:30
व्हॉट्स ऍप लवकरच आणणार नवीन फीचर; अपडेट येणार

कटकटच संपणार! तुमचं 'लास्ट सीन' आता 'त्यांना' नाही दिसणार; व्हॉट्स ऍप भन्नाट फीचर आणणार
लोकप्रिय मॅसेजिंग ऍप व्हॉट्स ऍप आता अपडेट होणार आहे. त्यामुळे प्रायव्हसी सेटिंग्समध्ये बदल होणार आहेत. या नव्या अपडेटमुळे आता निवडक व्यक्तींपासून लास्ट सीन लपवता येणं शक्य होईल. त्यामुळे लास्ट सीनवरून होणारे वाद, भांडणं, कुरबुरी आणि त्यामुळे होणारा मनस्ताप संपणार आहे
WABetaInfoच्या वृत्तानुसार, व्हॉट्स ऍप लवकरच नवीन अपडेट आणणार आहे. त्यामुळे लास्ट सीनच्या सेटिंग्जमध्ये मोठा बदल होणार आहे. नावडत्या व्यक्तींपासून 'लास्ट सीन' लपवण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होईल. अनेकदा लास्ट सीन वादाचं कारण ठरतं. इतक्या उशिरापर्यंत कोणासोबत बोलत होतास/होतीस, असा सवाल विचारून अनेकांमध्ये भांडणं झाली आहेत. नव्या फीचरमुळे ही भांडणं थांबू शकतील.
सध्या व्हॉट्स ऍपवर लास्ट सीनसाठी तीन पर्याय आहेत. इव्हरीवन, माय कॉन्टॅक्स आणि नोबडी असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. आता लवकरच व्हॉट्स ऍपवर नवं फीचर मिळेल. त्याचा वापर करून तुम्ही ठराविक व्यक्तींसाठी लास्ट सीन लपवू शकता. या फीचरचा वापर केल्यावर तुम्ही निवडलेल्या ठराविक व्यक्तींना तुमचं लास्ट सीन दिसणार नाही. इतरांना मित्र लास्ट सीन दिसेल.
व्हॉट्स ऍपवर लवकरच लास्ट सीनमध्ये चौथा पर्याय दिसू लागेल. My Contacts Except असा हा पर्याय असेल. यावर क्लिक करून तुम्हाला 'लास्ट सीन' कोणापासून लपवायचं आहे, त्यांची नावं कॉन्टॅक्ट लिस्टमधून निवडावी लागतील. लवकरच हे फीचर व्हॉट्स ऍप वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल.