भारतीय ग्राहकांचा डेटा हॅक होतो, तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 05:24 AM2021-05-26T05:24:44+5:302021-05-26T05:25:39+5:30
Cyber Crime News: सायबर गुन्हेगारीचा फटका भारताला फार मोठ्या प्रमाणात बसत आहे. विविध कंपन्यांच्या भारतीय ग्राहकांची माहिती चोरीला गेल्याच्या काही घटना वेगाने समोर येत आहेत.
- प्रसाद ताम्हणकर
(prasad.tamhankar@gmail.com)
कोरोना काळापासूनच जगभर सायबर गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या सायबर गुन्हेगारीचा फटका भारताला फार मोठ्या प्रमाणात बसत आहे. विविध कंपन्यांच्या भारतीय ग्राहकांची माहिती चोरीला गेल्याच्या काही घटना वेगाने समोर येत आहेत. त्यात डॉमिनोज, एअर इंडियासारख्या मातब्बर कंपन्यांचा समावेश आहे.
डॉमिनोज इंडिया कंपनीच्या तब्बल १८ कोटी ग्राहकांची वैयक्तिक माहिती एका हॅकरने ‘डार्क वेब’वर सार्वजनिक केली आहे. या पठ्ठ्याने चक्क एक सर्च इंजिन बनवून डार्क वेबवर टाकले आहे. त्याच्या मदतीने कोणालाही या ग्राहकांची माहिती मिळविता येत आहे. या माहितीमध्ये ग्राहकाचे नाव, पत्ता, ई-मेल आयडी, मोबाइल नंबर, जीपीएस लोकेशन यांचा समावेश आहे. मात्र, ग्राहकांची कोणतीही आर्थिक माहिती हॅक झालेली नसल्याची ग्वाही डॉमिनोज इंडियाने दिली आहे.
एअर इंडियाच्या तब्बल ४५ लाख प्रवाशांची माहिती सार्वजनिक झाली आहे. गंभीर बाब म्हणजे, यामध्ये भारतीय प्रवाशांबरोबर परदेशी प्रवाशांची माहितीदेखील हॅक करून सार्वजनिक करण्यात आली आहे. मात्र, ही माहिती थेट एअर इंडिया कंपनीच्या सर्व्हरमधून हॅक झाली नसून, एअर इंडियाची सेवादाता कंपनी असलेल्या ‘SITA’ या कंपनीच्या सर्व्हरमधून लीक झाली आहे. यामध्ये प्रवाशाचे नाव, जन्मतारीख, क्रेडिट कार्डची आणि पासपोर्टची पूर्ण माहिती अशा अत्यंत महत्त्वाच्या माहितीचा समावेश आहे.
एअरटेललादेखील सायबर गुन्ह्यांचा फटका बसत असून, कंपनीने आपल्या ग्राहकांना एक ई-मेल पाठवून, ‘एअरटेलचा कर्मचारी बोलत असल्याचे भासवून, KYC अपडेट करण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या कॉल्सपासून’ सावध राहण्याचा इशारा दिला आहे. हे हॅकर्स लोकांना ‘Airtel Quick Support’ नावाचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगतात. मात्र, हे ॲप्लिकेशन ‘प्ले स्टोअर’वर उपलब्ध नसल्याने, मग गोंधळलेल्या ग्राहकांना ‘TeamViewer Quick Support’ ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगून त्यांच्या मोबाइलचा पूर्ण ताबा मिळवतात व त्यानंतर मोबाइलमधील सर्व माहिती आणि सेव्ह केलेले पासवर्ड यांची चोरी करतात. अशा कोणत्याही फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा एअरटेलतर्फे देण्यात आला आहे.