तुमचं कुठलं मूल आहे ‘पासवर्ड चाइल्ड’?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 08:44 AM2023-12-19T08:44:05+5:302023-12-19T08:44:14+5:30

मेल बॉक्स ओपन करताना, ऑनलाइन पैसे हस्तांतरित करताना, अगदी मोबाइल सुरू करतानाही हल्ली पासवर्ड लागतो. त्यामुळे सहज लक्षात राहील, असा पासवर्ड शक्यतो ठेवला जातो.

Which child is your 'password child'? | तुमचं कुठलं मूल आहे ‘पासवर्ड चाइल्ड’?

तुमचं कुठलं मूल आहे ‘पासवर्ड चाइल्ड’?

- विनय उपासनी, मुख्य उपसंपादक, लोकमत, मुंबई
तसं पहायला गेलं तर प्रत्येक आई-बापाला आपली सर्व मुलं प्यारी असतात. त्यांच्यावर ते एकसमान प्रेम करतात. कोणतंही डावं-उजवं केलं जात नाही. तरीही सर्व मुलांमध्ये एक तरी लाडका वा लाडकी असतेच. आई-बापाला त्याचं-तिचं जरा जास्तच कौतुक असतं. शेंडेफळांच्या बाबतीत ही शक्यता अधिक असते. मग या लाडक्या वा लाडकीची जन्मतारीख वा त्याच्या नावाची आद्याक्षरं किंवा त्याचं-तिचं टोपणनाव यांचा वापर कोणत्याही ठिकाणच्या पासवर्डसाठी सर्रास केला जातो. या प्रकाराला ‘पासवर्ड चाइल्ड’ असं संबोधलं जातं. 

मेल बॉक्स ओपन करताना, ऑनलाइन पैसे हस्तांतरित करताना, अगदी मोबाइल सुरू करतानाही हल्ली पासवर्ड लागतो. त्यामुळे सहज लक्षात राहील, असा पासवर्ड शक्यतो ठेवला जातो. कोणी काय पासवर्ड ठेवावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरी अनेक जण आपल्या लेकराबाळांच्या नावाचा वा त्यांच्या जन्मतारखांचा पासवर्ड ठेवत असल्याचं निदर्शनास आलं आहे. जे मूल सर्वात प्रिय असतं त्याच्या नावाचा वा जन्मदिनांकाचा वापर पासवर्डसाठी केला जातो. असा वापर  करताना प्रामुख्याने तो लक्षात राहील हीच सोय बघितली जाते. पण इथे सोयीपेक्षा सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा  असतो.  
यंदाच्या मार्च महिन्यात ‘पासवर्ड चाइल्ड’ हा शब्द सर्वाधिक व्हायरल झाला. अजूनही या शब्दाची चलती असल्याने यंदाचा तो सर्वात चर्चेचा शब्द ठरला आहे.  

खरं तर पासवर्ड हा खासगी विषय असतो. आपले ऑनलाइन व्यवहार, पैशांची देवाणघेवाण, वैयक्तिक माहिती, महत्त्वाची कागदपत्रे यांचे डिजिटली जतन करायचे असेल तर त्या ठिकाणी पासवर्ड अतिशय ‘स्ट्राँग’ असावा लागतो. आपला पासवर्ड सहजपणे कोणीही भेदू शकेल, एवढाही तो तकलादू नसावा. म्हणूनच सायबर तज्ज्ञ आपल्या प्रियजनांच्या नावाने वा त्यांच्या जन्माक्षरांनी सुरुवात होणारे पासवर्ड शक्यतो टाळावेत, असा सल्ला देतात. आपले मुलांवर कितीही प्रेम असलं आणि त्यांचा कोणत्याही स्वरूपातला पासवर्ड सहज लक्षात ठेवण्यासारखा असला तरी आपली गोपनीयता अभेद्य ठेवण्यासाठी पासवर्ड चाइल्डचा वापर टाळावाच, असं तज्ज्ञांचं आग्रहाचं सांगणं आहे. आपल्या सुरक्षेसाठीच ते असतं, नाही का?

Web Title: Which child is your 'password child'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.