व्हॉट्सअॅप देणार चूक सुधारण्याची संधी, पाठवलेला मेसेज पोहोचण्याआधीच डिलीट करणं शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 02:47 PM2017-09-14T14:47:20+5:302017-09-14T14:53:37+5:30
व्हॉट्सअॅपने नवं फिचर आणलं असून यामुळे एखादा मेसेज चुकून फॉरवर्ड केल्यास तो पुन्हा मागे घेण्याची म्हणजेच रिकॉल करण्याची सुविधा मिळणार आहे. व्हॉट्सअॅप लवकरच अँड्रॉइड आणि आयओएसवर रिकॉलचा पर्याय देणार आहे. 'डिलीट फॉर एव्हरीवन' असं या ऑप्शनचं नाव असेल.
मुंबई, दि. 14 - व्हॉट्सअॅपवर अनेकदा एखादा मेसेज, फोटो, व्हिडीओ चुकून पाठवला जातो. मात्र तो डिलीट किंवा मागे घेण्याची कोणतीच सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे समोरच्या व्यक्तीची माफी मागणे एवढा एकच काय तो पर्याय बाकी राहायचा. पण आता व्हॉट्सअॅपने नवं फिचर आणलं असून यामुळे एखादा मेसेज चुकून फॉरवर्ड केल्यास तो पुन्हा मागे घेण्याची म्हणजेच रिकॉल करण्याची सुविधा मिळणार आहे. व्हॉट्सअॅप लवकरच अँड्रॉइड आणि आयओएसवर रिकॉलचा पर्याय देणार आहे. 'डिलीट फॉर एव्हरीवन' असं या ऑप्शनचं नाव असेल. व्हॉट्सअॅप बिटा इन्फो या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप हे फिचर टेस्ट करत आहे.
व्हॉट्सअॅप बिटा इन्फोने ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'व्हॉट्सअॅप अखेर डिलीट फॉर एव्हरीवन फिचरचं टेस्टिंग करत आहे. सर्व्हर अखेर काम करत असून, यशस्वीपणे पाठवण्यात आलेले मेसेज रिकॉल केले जात आहेत. कोणताही गाजावाजा न करता हे फिचर सुरु करण्यात येणार असून लवकरच युजर्सना ही सुविधा उपलब्ध होणार आहे'.
हे फिचर आल्यानंतर तुम्ही एखादा मेसेज, फोटो, ऑडिओ फाईल किंवा डॉक्यूमेंट फाईल रिसीव्हरकडे पोहोचण्याआधीच डिलीट करु शकणार आहात. मात्र यासाठी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे. एखादा मेसेज पाठवल्यानंतर तो रिकॉल करण्यासाठी म्हणजे पुन्हा मागे घेण्यासाठी तुमच्याकडे फक्त पाच मिनिटांचा वेळ असणार आहे. पाच मिनिटांनंतर तो मेसेज तुम्ही डिलीट करु शकत नाही. हे फिचर अँड्रॉइड आणि आयओएस युजर्ससाठी उपलब्ध असणार आहे.
DELETE FOR EVERYONE NEWS!
— WABetaInfo (@WABetaInfo) September 12, 2017
[AVAILABLE SOON!] pic.twitter.com/GQ6eqbNvSn
याच वेसबाईटने याआधी एक ट्विट केलं होतं, ज्यानुसार बीटा व्हर्जनमध्ये व्हॉट्सअॅपने पाठवण्यात आलेले मेसेज एडिट करण्याचा पर्याया सुरु केला होता. या फिचरचं टेस्टिंग झालं होतं. मात्र नंतर ते बंद करण्यात आलं असून, त्यावर काम सुरु आहे.
व्हॉट्सअॅप आपल्या युजर्साठी दरवेळी काहीतरी नवीन देण्याच्या हेतून फिचर्स आणण्याचा प्रयत्न करत असतात. याआधी त्यांनी आपल्या स्टेटस फिचरमध्ये बदल करत युजर्सना स्टेटसमध्ये फक्त टेक्स्ट न टाकता फोटो, व्हिडीओ आणि GIF टाकण्याची सोय दिली होती. व्हॉट्सअॅपने आपल्या आठव्या वाढदिवशी हे फिचर सुरु केलं होतं. पण युजर्सना हा बदल अजिबात आवडला नाही. मुळात नवं फिचर आलं आहे, यापेक्षा जुना टेक्स्टचा पर्याय गेल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. सोबतच ठेवलेला फोटो किंवा स्टेटसचा सर्वांना अलर्ट जातो हेदेखील अनेकांना आवडलेलं नव्हतं. आपला हा प्रयोग फसल्याचं पाहून व्हॉट्सअॅपनेही आपलं जुनं फिचर पुन्हा रिलाँच केलं होतं.व्हॉट्सअॅप एक प्रसिद्ध चॅटिंग अॅप असून, जगातील जवळपास 120 कोटी लोक त्याचा वापर करतात.