सोशल मीडियावर माणसं अस्वस्थ का?; सतत ऑनलाईन असण्याचा जबरदस्त थकवा येऊ शकतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 08:31 AM2021-11-11T08:31:10+5:302021-11-11T08:32:32+5:30
राग ही आदिम भावना आहे आणि तो आपल्या सगळ्यांना येतो. पण, सोशल मीडियावर त्याचं रूप ओंगळवाणं बनून जातं.
ऑनलाईन जगात जशी धमाल असते, अगणित फायदे असतात, गॉसिप असतं, दोस्ती असते तसाच प्रचंड रागही असतो आणि तो सातत्याने दिसत असतो. मग, ते ट्रोलिंग असो, हेट कॉमेन्ट्स असोत नाहीतर गॉसिपच्या नावाखाली सातत्याने व्यक्त होणारा राग असो. ऑनलाईन जगात वावरताना हा राग सतत दिसतो, जाणवतो आणि त्याचा त्रासही भोगण्याची वेळ येऊ शकते.
राग ही आदिम भावना आहे आणि तो आपल्या सगळ्यांना येतो. पण, सोशल मीडियावर त्याचं रूप ओंगळवाणं बनून जातं. अनोळखी माणसांवर विनाकारण आपण का रागावलेलो असतो हे समजून घेतलंच पाहिजे. सोशल मीडियावर माणसं सतत अस्वस्थ असतात. आपलं हटकेपण, वेगळेपण सिद्ध करायचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे दुसऱ्याला नावं ठेवणं. प्रत्यक्ष जगातही माणसं हे करतातच पण, ऑनलाईन जगात हे अस्त्र मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. स्वतःचं वेगळेपण जगाला दाखवण्याच्या नादात सतत इतर कुणाला तरी नावं ठेवली जातात आणि हे करता करता मोठ्या प्रमाणावर राग व्यक्त केला जातो.
सोशल मीडियावर माणसं सतत अस्वस्थ असतात. सतत रागावलेली असतात. चिडलेली असतात. कारण सतत ऑनलाईन असण्याचा जबरदस्त थकवा येऊ शकतो. आपल्याला हव्या त्या पद्धतीने तिथे गोष्टी घडल्या नाहीत तर, चिडचिड होऊ शकते आणि त्यातून येणारा राग प्रत्यक्ष आणि आभासी जगात निघायला सुरुवात होते. सतत ऑनलाईन असण्याच्या नादात मद्यपान, वेळेवर न खाणं, अति खाणं, पुरेशी झोप न होणं हे सगळे प्रकार घडतात. त्यातून एकूण शरीर स्वास्थ्य बिघडतं. परिणाम राग. अजून एक कारण म्हणजे ऑनलाईन होणाऱ्या चर्चा. यात माणसांचा पेशन्स चटकन संपतो आणि भांडाभांडी, रागराग सुरु होतो.
ऑनलाईन राग ही अतिशय कॉमन भावना आहे. कारण एकतर इथे निनावी वावरता येतं आणि नाव घेऊन वावरलं तरी लगेच कुणी दात तोडायला येणार नसतं. जी काही हाणामारी असते ती फक्त शाब्दिक असते, त्यामुळे ती काहीशी सेफ वाटते. मग, आपण अधिकच रागवायला आणि राग सतत व्यक्त करायला लागतो. ऑनलाईन ॲन्गर मॅनेजमेंटची आज जवळपास प्रत्येकाला गरज आहे. हा विषय नवा असला तरी टाळता येण्यासारखा नाहीये. कशी करावी ऑनलाईन ॲन्गर मॅनेजमेंट. बघूया पुढच्या भागात.