गुगलचे CEO सुंदर पिचाई करतात 20 स्मार्टफोनचा वापर?; स्वतःच सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 02:37 PM2024-02-15T14:37:25+5:302024-02-15T14:38:46+5:30
Sundar Pichai : मुलाखतीत सुंदर पिचाई यांनी ते किती फोन वापरतात हे सांगितलं होतं. AI हा माणसाने लावलेला सर्वात महत्त्वाचा शोध असल्याचेही त्यांनी सांगितले.
मोठ्या टेक कंपन्यांचे व्यवस्थापन करणारे लोक टेक्नॉलॉजीचा नेमका किती वापर करतात? हा प्रश्न अनेकवेळा लोकांच्या मनात येतो. अशाच काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिली आहेत. त्यांनी 2021 मध्ये दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या टेक्नॉलॉजीशी संबंधित सवयींचा खुलासा केला होता. या मुलाखतीत सुंदर पिचाई यांनी ते किती फोन वापरतात हे सांगितलं होतं. AI हा माणसाने लावलेला सर्वात महत्त्वाचा शोध असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुंदर पिचाई किती फोन वापरतात?
सुंदर पिचाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते वेगवेगळ्या कारणांसाठी 20 हून अधिक फोन वापरतात. जिथे लोकांना एक-दोन फोन मॅनेज करणे कठीण होत आहे, तिथे सुंदर पिचाई 20 हून अधिक फोन वापरतात. पिचाई यांनी सांगितलं की, गुगलच्या सर्व सर्व्हिसेसची टेस्ट घेण्यासाठी त्यांना हे करावे लागतं.
"वारंवार पासवर्ड बदलत नाही"
याशिवाय सुंदर पिचाई यांनी या मुलाखतीत इतरही अनेक खुलासे केले आहेत. त्यांना त्यांच्या अकाऊंट्स सेफ्टीबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं की, ते वारंवार पासवर्ड बदलत नाही. त्याऐवजी, ते एक्स्ट्रा सिक्योरिटीसाठी टू-फैक्टर ऑथेंटिकेशनर अवलंबून असतात. पिचाई मॉडर्न सिक्योरिटी वापरत असल्याचं दिसून येतं.
मुलं किती वेळ स्क्रिनवर घालवतात?
आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत काही कल्पनाही शेअर केल्या आहेत. एआय हे मानवाने निर्माण केलेले सर्वात महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे, असा त्यांचा विश्वास आहे. सुंदर पिचाई यांनी स्क्रीन टाइम संदर्भात काही खास गोष्टीही शेअर केल्या आहेत. तुमची मुलं किती वेळ स्क्रिनवर घालवतात? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला होता.
मुलांवर कडक नियम लावण्यापेक्षा काही पर्सनल लिमिट्स ठरवण्यात आल्याचं सुंदर पिचाई यांनी म्हटलं आहे. नवीन पिढीला टेक्नॉलॉजीबाबत शिकावं लागेल, ती अंगीकारावी लागेल. हा त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे असं देखील सुंदर पिचाई यांनी म्हटलं आहे.