मोबाईल नंबर १० आकडीच का असतो? कधी विचार केलाय? जाणून घ्या इंटरेस्टिंग कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 10:40 AM2021-11-13T10:40:45+5:302021-11-13T10:42:05+5:30
मोबाईल नंबर सेव्ह करताना आपण १० आकडे तपासून पाहतो.. पण मोबाईल नंबरमध्ये १० आकडेच का असतात?
मुंबई: एखाद्या व्यक्तीचा मोबाईल नंबर सेव्ह करताना, कोणालाही कॉल करत असताना आपण नंबर तपासून पाहतो. चुकून एखादा आकडा कमी-जास्त झाला नाही ना, याची खातरजमा करतो. पण मोबाईल क्रमांकात १० आकडेच का असतात याचा विचार कधी केला आहे का? यामागचं नेमकं कारण काय..?
भारतात प्रत्येक व्यक्तीला १० आकडी मोबाईल नंबर मिळतो. सरकारची राष्ट्रीय नंबरिंग योजना हे यामागचं कारण आहे. मोबाईल नंबर एक अंकी असल्यास ० ते ९ पर्यंत केवळ १० जणांनाच वेगवेगळे नंबर मिळाले असते. त्यामुळे १० नंबर तयार होतील आणि केवळ १० जणच त्यांचा वापर करू शकतील. २ अंकी नंबर असल्यास ० ते ९९ पर्यंत १०० नंबर तयार होतील आणि १०० जणच त्यांचा वापर करू शकतील.
मोबाईल नंबरमध्ये १० आकडे असण्यामागचं दुसरं कारण आहे देशाची लोकसंख्या. देशाची सध्याची लोकसंख्या १३० कोटी आहे. त्यामुळे ९ आकडी मोबाईल नंबर दिला गेल्यास भविष्यात सगळ्यांना मोबाईल नंबर मिळू शकणार नाही. १० आकडी मोबाईल नंबर असल्यास एक हजार कोटी नंबर्स तयार होतात. हाच विचार करून मोबाईल नंबर्स १० आकडी ठेवण्यात आले.
२००३ पर्यंत देशात ९ आकडी मोबाईल नंबर होते. मात्र वाढती लोकसंख्या लक्षात घेता ट्रायनं मोबाईल नंबर १० आकडी केले. १५ जानेवारी २०२१ पासून लँडलाईनहून फोन नंबर लावताना त्यापुढे शून्य लावण्याची सूचना दिली. या बदलामुळे दूरसंचार कंपन्यांना मोबाईल सेवांसाठी २५४.४ कोटी अतिरिक्त नंबर उपलब्ध झाले.