अॅक्टर रोबो मराठीत बोलणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 06:49 AM2019-12-17T06:49:09+5:302019-12-17T06:49:21+5:30
मुंबईकरांना उत्सुकता : ३० हून अधिक भाषा येणारा थेस्पियन आयआयटी टेकफेस्टमध्ये होणार सहभागी
मुंबई : अनेकदा हॉस्पिटल्स, हॉटेल्स, एअरपोर्ट वा मोठ्या कारखान्यांमध्ये रोबोटमार्फत अनेक कामे पार पाडली जातात. मात्र आता अभिनयातून मनोरंजन करणारा रोबोही मुंबईकरांना पाहायला मिळणार आहे. यंदाच्या आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये हा रोबो थेस्पियन सहभागी होणार आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे तो ३० हून अधिक भाषा बोलू शकतो. शिवाय ७० हून अधिक आवाज काढू शकतो. त्यामुळे तो मराठीतही बोलणार का? अशी उत्सुकता आहे.
‘तंत्रज्ञानाचा कुंभमेळा’ अशी ओळख असलेल्या आयआयटी टेकफेस्टमध्ये रोबो थेस्पिअनला आमंत्रित केले आहे. जगभरात अनेक इव्हेंट्स करणारा हा रोबो पहिल्यांदाच भारतात येणार आहे. ‘जगातील पहिला अॅक्टर आणि परफॉर्मर’ अशी त्याची ओळख आहे. ५ फूट ९ इंच उंच आणि ३३ किलो वजनाच्या रोबोच्या काही हालचाली या एअर मसल्स व सर्वो मोटरच्या साहाय्याने नियंत्रित केल्या जातात. मानवी हालचालींसारखाच वावर असणारा हा रोबो समोरची व्यक्ती स्त्री आहे की पुरुष? तिचे वय आणि चेहऱ्यावरील हावभाव सहज ओळखू शकतो.
यंदा ३ ते ५ जानेवारीदरम्यान इव्हेंट होणार
ह्युमनॉइड सोफिया हा रोबो मागच्या वर्षी टेकफेस्टमध्ये
सहभागी झाला होता, तेव्हा ‘नमस्ते इंडिया’ म्हणून सोफियाने मुलाखतीदरम्यान सर्वांचे स्वागत केले होते. यंदा ३ ते ५ जानेवारी या काळात हा इव्हेंट होत आहे.
गर्दीतील चेहरेही सहजरीत्या ओळखण्यात पारंगत
तितक्याच सहजरीत्या- रोबो थेस्पिअन हा ह्युमनॉइड आहे. त्याच्या शारीरिक हालचालींसोबतची एलईडी लाईट व एलसीडी डोळ्यांमधून शब्दांसोबत व्यक्त होणाºया भावना समोरच्या व्यक्तीला मंत्रमुग्ध करणाºया आहेत.
दिलेल्या स्क्रिप्टप्रमाणे डायलॉग डिलिव्हरी करून त्यात एक्स्प्रेशन्स देणे, सोबतच डान्स करणे, उत्तमरीत्या गाणे अशा कलांनी परिपूर्ण असल्याने थेस्पिअन उत्तम कलाकार आणि अभिनेता म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे.
त्याच्यातील मोशन कॅप्चर सॉफ्टवेअरमुळे तो एखाद्याची हुबेहूब नक्कल करू शकतो; सोबतच गर्दीतील चेहरेही तितक्याच सहजरीत्या ओळखू शकतो.