अंबानींना नाराज करून मोदी मस्कसाठी नियम बदलणार का? जिओ-स्टारलिंकच्या युद्धात तिसरी कंपनी...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 11:02 AM2023-06-25T11:02:34+5:302023-06-25T11:03:24+5:30
स्टारलिंकने गेल्या वर्षी भारतात इंटरनेट सेवा सुरु केली होती. परंतू, नियमांचे उल्लंघन झाल्याने स्टारलिंकला सेवा बंद करावी लागली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यात टेस्लाचे मालक एलन मस्क यांची भेट घेतली. या भेटीत मस्क यांनी पुढील वर्षी टेस्ला भारतात येणार असल्याची घोषणा केली. परंतू, त्याहून अधिक चर्चेची बाब म्हणजे मस्क यांची इंटरनेट सेवा पुरविणारी कंपनी स्टारलिंकच्या भारत प्रवेशाची झाली आहे. मोदी स्टारलिंक सुरु करण्यासाठी सूट देऊ शकतात का, यावर चर्चा होऊ लागली आहे. असे झाले तर अंबानींच्या जिओला टक्कर मिळणार आहे.
स्टारलिंकने गेल्या वर्षी भारतात इंटरनेट सेवा सुरु केली होती. परंतू, नियमांचे उल्लंघन झाल्याने स्टारलिंकला सेवा बंद करावी लागली होती. मोदींसोबत अमेरिकेतील व्हाईट हाऊस डीनरला मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नीने हजेरी लावली होती. स्टारलिंकसाठी मोदी अंबानींऐवजी मस्कना जास्त भाव देतील का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
हे संपूर्ण प्रकरण सॅटेलाइट ब्रॉडबँड स्पेक्ट्रमच्या वाटपाचे आहे. मस्क यांना वाटतेय की भारताने स्पेक्ट्रमच्या लिलावाऐवजी कंपन्यांना देऊन टाकावेत. स्पेक्ट्रम लिलावामुळे भौगोलिक निर्बंधांचा सामना करावा लागतो. त्यामुळे इंटरनेटची किंमत वाढते, असा दावा मस्क यांचा आहे. तर दुसरीकडे मुकेश अंबानी स्पेक्ट्रम लिलावाची मागणी करत आहेद. लिलावात सहभागी होऊन स्पर्धा करा, असे अंबानींचे म्हणणे आहे. या वादात मोदी कोणाची बाजू घेतात यावरून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात चर्चा सुरु झाली आहे.
सॅटेलाईट सेवेमध्ये फायबर केबल टाकण्याची किंवा टॉवर उभारण्याची गरज नाहीय. स्टारलिंक या क्षेत्रात माहिर आहे. परंतू, एअरटेल सुद्धा सॅटेलाइट सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींनी जर नियम शिथिल करून स्टारलिंकला भारतात परवानगी दिली तर मस्क यांना आणखी एका भारतीय कंपनीसोबत स्पर्धा करावी लागणार आहे.