Telegram : भारतात 'टेलीग्राम'वर बंदी घातली जाणार? कंपनी तपास यंत्रणांच्या रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 08:46 AM2024-08-27T08:46:43+5:302024-08-27T08:47:14+5:30
Telegram : टेलीग्रामचे भारतात ५० लाखांहून अधिक युजर्स आहेत.
नवी दिल्ली: टेलीग्राम या मेसेजिंग अॅपचे संस्थापक आणि सीईओ पावेल ड्युराव यांना शनिवारी पॅरिस येथे अटक आली. या पार्श्वभूमीवर भारतात खंडणी आणि जुगार आदी कारवायांमध्ये या अॅपचा सहभाग आहे की नाही याचा तपास केल्यानंतर टेलीग्रामवर बंदी घालण्याबाबत विचार केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अॅपवर सुरु असलेल्या गुन्हेगारी कारवाया रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत टेलीग्रामच्या सीईओना फ्रान्समध्ये अटक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय सायबर क्राइम कॉर्डिनेशन सेंटर आणि इलेक्ट्रॉनिक्स व आयटी मंत्रालयाचे अधिकारी टेलिग्रामवरील दैनंदिन व्यवहारांचा अभ्यास करीत आहेत. टेलीग्रामचे भारतात ५० लाखांहून अधिक युजर्स आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर ही अकाऊंट ब्लॉक करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
एका सरकारी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर मनीकंट्रोलला दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालय (MeitY) टेलीग्रामवरील P2P कम्युनिकेशनची चौकशी करत आहे. तसेच, गृह मंत्रालय आणि MeitY द्वारे करण्यात येत असलेल्या तपासात खंडणी आणि जुगार यांसारख्या गुन्हेगारी कृत्यांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. याशिवाय, हा प्लॅटफॉर्म ब्लॉक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तपासात जे काही समोर येईल त्याआधारे निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.