तुमचे व्हॉट्सॲप बंद हाेणार का?; ४७ लाख युझर्सचे WhatsApp बॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 07:55 AM2023-05-03T07:55:25+5:302023-05-03T07:55:57+5:30
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला व्हॉट्सॲपने एक मोठा बदल केला आहे. आता वापरकर्ते एकाच वेळी चार फोनमध्ये एकच खाते (लॉग-इन) वापरू शकतील.
नवी दिल्ली - युझर्सच्या तक्रारी आणि नियमांच्या आधारे व्हॉट्सॲपने मार्च २०२३ मध्ये भारतातील ४७ लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली आहे. व्हॉट्सॲपच्या मासिक अहवालानुसार, कंपनीने १ मार्च ते ३१ मार्च २०२३ दरम्यान ४७,१५,९०६ वापरकर्त्यांच्या खात्यांवर बंदी घातली आहे.
बंदी का घातली ?
भारतीय कायदा आणि व्हॉट्सॲपच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या खात्यांवर बंदी घातली आहे.
४,७२० तक्रारी व्हॉट्सॲपकडे प्राप्त झाल्या होत्या.
४,३१६ तक्रारींमध्ये खाते बंद करण्याची मागणी करण्यात आली होती.
५८५ तक्रारींवर व्हॉट्सॲपने कारवाई केली आहे. हे प्रमाण अतिशय कमी असल्याचे समोर आले आहे.
का होते कारवाई?
कंपनीच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्याने त्याच्या व्हॉट्सॲपवर बेकायदेशीर, अश्लील, बदनामीकारक, धमकी देणारा, धमकावणारा किंवा त्रास देणारा, द्वेष पसरवणारा किंवा भडकावणारा मजकूर शेअर केला तर त्याच्या खात्यावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, जर एखाद्या वापरकर्त्याने कंपनीच्या नियम व अटींचे उल्लंघन केले तर खातेदेखील बॅन केले जाऊ शकते.
व्हॉट्सॲपचे एकच खाते चार मोबाइलवर
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला व्हॉट्सॲपने एक मोठा बदल केला आहे. आता वापरकर्ते एकाच वेळी चार फोनमध्ये एकच खाते (लॉग-इन) वापरू शकतील. आता हे वैशिष्ट्य ४ फोनसाठीही उपलब्ध असेल. हे फिचर काही आठवड्यांत सर्व वापरकर्त्यांना वापरता येणार आहे.