विंडोज १० प्रणालीत डोळ्यांनी नियंत्रीत होणार संगणक !

By शेखर पाटील | Published: August 4, 2017 05:18 PM2017-08-04T17:18:40+5:302017-08-04T17:19:29+5:30

विंडोज १० या ऑपरेटींग सिस्टीमच्या आगामी अपडेटमध्ये आय ट्रॅकर प्रणाली देण्यात आली असून यामुळे फक्त डोळ्यांच्या हालचालींनी संगणक वापरता येणार आहे.

Windows 10 system will control your eyes! | विंडोज १० प्रणालीत डोळ्यांनी नियंत्रीत होणार संगणक !

विंडोज १० प्रणालीत डोळ्यांनी नियंत्रीत होणार संगणक !

विंडोज १० या ऑपरेटींग सिस्टीमच्या आगामी अपडेटमध्ये आय ट्रॅकर प्रणाली देण्यात आली असून यामुळे फक्त डोळ्यांच्या हालचालींनी संगणक वापरता येणार आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपल्या विंडोज १० या ऑपरेटींग सिस्टीमचे आगामी अपडेट लवकरच सादर करणार असून यात नेमके कोणते फिचर्स असतील? याबाबत काही दिवसांपासून उत्सुकता लागली होती. या पार्श्‍वभूमिवर, खुद्द मायक्रोसॉफ्टनेच एका ब्लॉगपोस्टद्वारे https://blogs.msdn.microsoft.com/accessibility/2017/08/01/from-hack-to-product-microsoft-empowers-people-with-eye-control-for-windows-10) याबाबतचे सविस्तर विवेचन केले आहे. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे निव्वळ डोळ्यांच्या हालचालींनी संगणकाचे कार्यान्वयन हेच होय. या सर्व प्रकाराचा प्रारंभ २०१४ साली झाला. तेव्हा अमेरिकेतील माजी विख्यात रग्बीपटू स्टीव्ह ग्लेसन याने मायक्रोसॉफ्टला एक ई-मेल पाठविला. तो एएलएइ म्हणजेच अमिओट्रॉपीक लॅटरल स्केलरोसीस या स्नायूच्या विकाराने त्रस्त असल्याने बोटांच्या मदतीने कि-बोर्ड व पर्यायाने संगणक वापरू शकत नसल्याचे नमूद करण्यात आले होते. आपल्यासारख्या व्याधीग्रस्तांसाठी मायक्रोसॉफ्टने संगणक वापरण्याची सुविधा द्यावी असे आवाहन त्याने केले होते. यानुसार मायक्रोसॉफ्टने आपल्या कर्मचार्‍यांसाठी हॅकेथॉन या स्पर्धेत हे चॅलेंज सादर केले. यात कंपनीच्या कर्मचार्‍यांच्या एका चमूने डोळ्यांनी नियंत्रीत करता येणारी व्हिलचेअर तयार केली. यानंतर आता तीन वर्षानी विंडोज १० प्रणालीत आय ट्रॅकींग सिस्टीम प्रदान करण्यात आली आहे.

मायक्रोसॉफ्टने आपल्या विंडोज १० प्रणालीस टोबी या स्वीडीश कंपनीच्या आय ट्रॅकरशी संलग्न केले आहे. म्हणजेच विंडोज प्रणालीची आज्ञावली आणि टोबीचे कार्यान्वयन याचा मिलाफ केल्यामुळे हातांनी कि-बोर्ड वा माऊस ऑपरेट न करता येणारे आणि याच्या जोडीला ध्वनी आज्ञावलीचा (व्हाईस कमांड) वापर करण्यास सक्षम नसणार्‍यांना डोळ्यांच्या हालचालींनी संगणक वापरणे सुलभ होणार आहे. यात संगणकाच्या स्क्रीनवर नजर रोखून धरल्यानंतर डोळे हे माऊसच्या कर्सरसारखे काम करतात. अर्थात याच्या मदतीने संगणकाच्या काही फंक्शन्सचा वापर करता येत असल्याचे मायक्रोसॉफ्टने नमूद केले आहे.  यात डोळ्यांच्या मदतीने हव्या त्या आयकॉनवर क्लिक करण, प्राथमिक स्वरूपाचे टायपिंग, टेक्स्ट-टू-स्पीच प्रणालीचा वापर आदींचा समावेश आहे. येत्या काही दिवसांमध्ये विंडोज १० सिस्टीमच्या अपडेटमध्ये जगातील सर्व युजर्सला ही सुविधा मिळणार आहे. तत्पूर्वी कुणाला याचा वापर करावयाचा असल्यास विंडोज प्रणालीच्या प्रयोगात्मक अवस्थेतील वापर करण्यासाठी देण्यात आलेल्या विंडोज इनसायडर या प्रोजेक्टमध्ये https://insider.windows.com/en-gb ) सहभागी व्हावे लागेल.

खाली पहा:- विंडोज १०च्या आगामी आवृत्तीत असणार्‍या आय ट्रॅकरची माहिती देणारा मायक्रोसॉफ्टने जारी केलेला व्हिडीओ.

Web Title: Windows 10 system will control your eyes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.