सात कॅमेऱ्यांचा जगातील पहिला स्मार्टफोन लवकरच होणार लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 02:52 PM2019-01-01T14:52:04+5:302019-01-01T15:28:32+5:30
नोकिया कंपनी हा स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे. Nokia 9 PureView असं या स्मार्टफोनचं नाव असून त्याचे काही व्हिडिओ आणि फोटोही समोर आले आहेत.
नवी दिल्ली - स्मार्टफोन हा सर्वाच्याच जगण्याचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. स्मार्टफोन तयार करणाऱ्या अनेक कंपन्या नवीन फीचरसह फोन लाँच करत असतात. सात कॅमेऱ्यांचा जगातील पहिला स्मार्टफोन लवकरच लाँच होणार आहे. नोकिया कंपनी हा स्मार्टफोन आणण्याच्या तयारी करीत आहे. Nokia 9 PureView असं या स्मार्टफोनचं नाव असून त्याचे काही व्हिडिओ आणि फोटोही समोर आले आहेत. या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे यात एकूण 7 कॅमेरे आहेत. फ्रन्टला दोन आणि फोनच्या मागे 5 असे कॅमेरे या स्मार्टफोनमध्ये देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नोकियाच्या या स्मार्टफोनमध्ये पाठीमागे असलेले दोन कॅमेरे 12-12 मेगापिक्सलचे असणार आहेत. तर दोन कॅमेरे 16-16 मेगापिक्सलचे असतील. पाचवा कॅमेरा हा 8 मेगापिक्सलचा असणार आहे. Nokia 9 PureView ला पाठीमागे दिलेल्या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅश आणि आयआर सेन्सर लेजर ऑटोफोकस देण्यात आलेला आहे.
स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी फोनच्या फ्रन्टमध्ये दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. नोकियाच्या या मोबाइलमध्ये 6 इंचाचा डिस्प्ले असणार आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 256 स्टोरेजचा पर्याय देण्यात आलेला असू शकतो. नोकियाच्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर असू शकतो. या स्मार्टफोनची किंमत 4,799 युआन म्हणजेच जवळपास 50 हजार रुपये असण्याची शक्यता आहे.