World Password Day : जगभरात साजरा केल्या जाणाऱ्या 'पासवर्ड दिनाचे' महत्त्व काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 03:35 PM2019-05-02T15:35:55+5:302019-05-02T15:38:12+5:30
जगभरात आज 'वर्ल्ड पासवर्ड डे' साजरा केला जात आहे. या दिवशी लोक एकमेकांना योग्य पासवर्ड ठेवण्याचा तसेच हॅकर्सपासून बचाव करण्याचा सल्ला देतात. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या गुरुवारी वर्ल्ड पासवर्ड डे साजरा केला जातो.
नवी दिल्ली - सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असून अनेकांचे ऑनलाईन अकाऊंट असतात. हे ऑनलाईन अकाऊंट वापरण्यासाठी एक युजर नेम आणि पासवर्डची आवश्यकता असते. मात्र काही वेळा खूप जास्त अकाऊंट असल्याने सर्व पासवर्ड लक्षात ठेवणं थोडं कठीण असतं. तसेच आपला पासवर्ड अन्य व्यक्तीला समजल्यास हॅक होण्याची शक्यता ही अधिक असते. जगभरात आज 'वर्ल्ड पासवर्ड डे' साजरा केला जात आहे. या दिवशी लोक एकमेकांना योग्य पासवर्ड ठेवण्याचा तसेच हॅकर्सपासून बचाव करण्याचा सल्ला देतात. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या गुरुवारी वर्ल्ड पासवर्ड डे साजरा केला जातो.
पासवर्डबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची सुरुवात सिक्योरिटी विशेषज्ञ मार्क बर्ननेट यांनी केली आहे. तसेच 2005 साली मार्क बर्ननेट यांनी परफेक्ट पासवर्ड नावाचे एक पुस्तक लिहिले होते. आयडिया आणि इंटेल या दोन टेक कंपन्यांनी मार्क यांच्या पुस्तकापासून प्रेरीत होऊन 2013 मध्ये मे महिन्याच्या पहिला गुरुवार वर्ल्ड पासवर्ड डे म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. त्यानंतर मे महिन्यातील पहिला गुरुवार वर्ल्ड पासवर्ड डे म्हणून साजरा केला जातो. पासवर्ड सहजपणे लक्षात राहावा यासाठी युजर्स नकळत काही सोपे पासवर्ड अकाऊंटसाठी सेट करतात. मात्र असे सोपे पासवर्ड हॅकर्सही काही मिनिटातच हॅक करू शकतात. त्यामुळे योग्य पासवर्ड ठेवणे गरजेचे आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
तब्बल सव्वा दोन कोटी लोक ठेवतात 'हा' पासवर्ड; तुमचाही आहे का?
यूकेच्या नॅशनल सायबर सिक्यॉरिटी सेंटर (NCSC) ने दिलेल्या एका डेटानुसार, '123456' हा जगभरात सर्वात जास्त वापरला जाणारा कॉमन पासवर्ड असून तो अत्यंत सहजपणे हॅक केला जाऊ शकतो. तर '123456789' हा पासवर्ड दुसऱ्या क्रमांकावर आहे. यासोबतच 'qwerty', '1111111' आणि 'password' हे पासवर्ड देखील असुरक्षित पासवर्डच्या यादीत सर्वात वरच्या स्थानी आहे. 123456 हा पासवर्ड वापरणाऱ्यांची संख्या ही तब्बल 2 कोटी 30 लाखांहूनही अधिक असल्याची माहिती संशोधनातून समोर आली आहे.
Ashley, Michael, Daniel, Jessica आणि Charlie हे पासवर्डही आता कॉमन झाले असून हे सहज हॅक करता येतात. काही युजर्स फुटबॉल टीम, बॅटमॅन आणि सुपरमॅन सारखे सुपरहीरो आणि पोकेमॉनसारखे कार्टून कॅरेक्टर आपला पासवर्ड म्हणून सेट करत असल्याची माहिती संशोधनातून समोर आली आहे. जर तुम्ही देखील अशाच प्रकारचे पासवर्ड सेट करत असाल तर सतर्क व्हा आणि पासवर्ड लगेचच बदला जेणेकरून तुमचं आकाऊंट हे सुरक्षित राहील. एनसीएससीचे टेक्निकल डायरेक्टर डॉ. इयान लेवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे लोक सोप्या पासवर्डचा वापर करतात ते स्वत: हून हॅकींगचे शिकार होत आहेत. त्यामुळे हॅकींगपासून बचाव करायचा असल्यास सुरक्षित पासवर्ड सेट करा.
2018 मध्ये सर्वात जास्त हॅक झालेल्या पासवर्डचा काही दिवसांपूर्वी खुलासा झाला होता. हा खुलासा सायबर सिक्युरिटी संस्था स्प्लॅशडेटाने केला होता. हॅक केलेल्या पासवर्डच्या यादीत 123456 हे आकडे सर्वात वर आहेत. तर Password हा शब्द दुसऱ्या क्रमांकावर होता. हे दोन्ही पासवर्ड टॉपवर असण्याचं हे सलग पाचवं वर्ष होतं. सिक्युरिटी रिसर्चर्स सतत पासवर्डबाबत इशारा देत असतात. तरीही सुद्धा जगभरात लाखो लोक त्यांच्या ई-मेल, स्मार्टफोन, लॅपटॉप, कम्प्युटर आणि दुसऱ्या डिव्हायसेसना सुरक्षित करण्यासाठी कमजोर आणि सहजपणे लक्षात येणारे पासवर्ड ठेवतात. सायबर सिक्युरिटी संस्था स्प्लॅशडेटाचा रिसर्च हा हॅक झालेल्या 50 लाख अकाऊंटवर आधारित होती. संस्थेने 2018 च्या 25 सर्वात खराब पासवर्डची माहिती जाहीर केली होती.