इवलीशी बॅटरी, ५० वर्षे चालणार! चीनने पहिल्यांदाच चांगले काम केले; मोठी क्रांती होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 11:32 AM2024-01-17T11:32:09+5:302024-01-17T11:32:57+5:30
पेसमेकरसारखी वैद्यकीय उपकरणे देखील बनवता येतील. एकंदरीतच ही बॅटरी एक मोठी क्रांती आणणार आहे.
चीनने एक मोठा प्रताप करून दाखविला आहे. यामुळे स्मार्टफोन आणि ड्रोनचे जगच बदलून जाणार आहे. पाच रुपयाच्या आकाराएवढी छोटी बॅटरी चीनच्या कंपनीने तयार केली असून ती एका चार्ज केल्यावर ५० वर्षे चालणार आहे. तुम्हाला धक्का बसलाय ना, विश्वास बसत नाहीय ना? परंतु हे खरे आहे.
ही बॅटरी लिथिअम आयन किंवा अन्य कुठल्या साध्यासुध्या घटकापासून नाही तर जगाला हादरवू शकणाऱ्या अशा अणुउर्जेपासून बनली आहे. अणुउर्जेचा शोध हा चांगल्या कारणासाठी लागला होता, परंतु दुष्प्रवृत्तींना त्याचा वापर अण्वस्त्रे बनविण्यासाठी केला. हीच अणुउर्जा आता बॅटरीमध्ये वापरण्यात येत आहे.
दी इन्डिपेंडन्ट नुसार बिजिंगच्या Betavolt या कंपनीने एक न्युक्लिअर बॅटरी बनविली आहे. सर्वसाधारणपणे न्युक्लिअर बॅटरी ही खूप मोठी असते. परंतु या कंपनीने एका नाण्याच्या आकाराची बॅटरी बनवून कमाल केली आहे. ही बॅटरी येत्या काही काळात स्मार्टफोन, ड्रोनसारख्या उपकरणांमध्ये वापरता येऊ शकते. तसेच ही बॅटरी अंतराळातील उपग्रह, उपकरणांसाठी देखील वापरता येऊ शकते.
या बॅटरीच्या वापराने स्मार्टफोन स्लीम होऊ शकतात, वजनाने हलके होऊ शकतात. पुढच्या पिढीच्या बॅटरीची चीनमध्ये चाचणी घेण्यात आली असून लवकरच फोन आणि ड्रोनसारख्या व्यावसायिक उत्पादनांसाठी आण्विक बॅटरीचे उत्पादन सुरू होईल. या बॅटरीचा आकार 15 x 15x5 मिमीमध्ये आहे. बॅटरीच्या रेडिएशनचा मानवी शरीरावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही, असे बीटावोल्ट कंपनीचे म्हणणे आहे. त्याच्या मदतीने पेसमेकरसारखी वैद्यकीय उपकरणे देखील बनवता येतील. एकंदरीतच ही बॅटरी एक मोठी क्रांती आणणार आहे.