भारतात मिळणार एक्सबॉक्स वन एक्स
By शेखर पाटील | Published: January 5, 2018 02:50 PM2018-01-05T14:50:25+5:302018-01-05T14:51:17+5:30
मायक्रोसॉफ्टने आपला एक्सबॉक्स वन एक्स हा गेमिंग कन्सोल भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. यात फोर-के क्षमतेच्या गेमिंगसह अनेक अद्ययावत फिचर्स आहेत.
मायक्रोसॉफ्टने आपला एक्सबॉक्स वन एक्स हा गेमिंग कन्सोल भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. यात फोर-के क्षमतेच्या गेमिंगसह अनेक अद्ययावत फिचर्स आहेत.
मायक्रोसॉफ्ट कंपनीने गत जून महिन्यात इ-३ या वार्षिक गेम फेस्टमध्ये एक्सबॉक्स वन एक्स या गेमिंग कन्सोलची घोषणा केली होती. याला प्रोजेक्ट स्कॉर्पिओ या नावाने विकसित करण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हे मॉडेल प्रत्यक्षात ग्राहकांना मिळू लागले होते. आजवर भारतीय बाजारपेठेत ग्रे मार्केटमध्ये हा गेमिंग कन्सोल विकला जात होता. तथापि, आता मायक्रोसॉफ्टने याला अधिकृतरित्या लाँच करण्याचे जाहीर केले आहे. यानुसार १५ जानेवारीपासून एक्सबॉक्स वन एक्स हा गेमिंग कन्सोल फ्लिपकार्ट आणि अमेझॉन इंडिया या ई-पोर्टलसह देशभरातील निवडक शॉपीजमधून खरेदी करता येणार आहे. याला भारतीय ग्राहकांसाठी ४४,९९० रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे.
एक्सबॉक्स वन एक्स हा कन्सोल एक्सबॉक्स आणि एक्सबॉक्स वन या आधीच्या मॉडेल्सची अद्ययावत आवृत्ती आहे. या मॉडेलमध्ये अनेक सरस फिचर्सचा समावेश आहे. यातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे यात फोर-के क्षमतेच्या आणि ६० फ्रेम्स प्रति-सेकंद इतक्या गतीच्या चित्रीकरणात गेमिंगचा आनंद घेता येणार आहे. आजवर फक्त सोनी कंपनीच्या प्लेस्टेशन ४ या मॉडेलमध्ये अशा प्रकारचा फोर-के सपोर्ट प्रदान करण्यात आला होता. यामुळे एक्सबॉक्स वन एक्स त्या मॉडेलला तगडे आव्हान देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याची रॅम १२ जीबी, बँडविडथ् ३२६ जीबी तर स्टोअरेज तब्बल एक टिबी इतके असेल. तर कनेक्टिव्हिटीसाठी एचडीएमआय, युएसबी ३.०, इथरनेट, आयआर रिसिव्हर/ब्लास्टर आदींचा समावेश असेल. उच्च ग्राफीक्सने युक्त असणार्या गेम्समुळे हा कन्सोल तापू नये म्हणून यात खास व्हेपर-चेंबर कुलींग प्रणाली देण्यात आली आहे. मायक्रोसॉफ्टने खास या मॉडेलसाठी अनेक गेम्सची घोषणा केली आहे. तथापि, आधीच्या अर्थात एक्सबॉक्स वन या मॉडेलवर चालणारे बहुतांश गेम्स यातही खेळता येणार आहे. यामुळे गेमर्सला अतिरिक्त भुर्दंड पडणार नाही.