फक्त 8 मिनिटांत फुल चार्ज होणार 'हा' स्मार्टफोन; 200W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी लवकरच येणार बाजारात
By सिद्धेश जाधव | Published: August 12, 2021 06:48 PM2021-08-12T18:48:24+5:302021-08-12T18:52:57+5:30
HyperCharge in Mi Mix 5: जून 2022 पासून शाओमी हायपरचार्ज टेक्नॉलॉजीचे मास प्रोडक्शन सुरु होणार आहे. पुढल्या वर्षी सादर होणारा Mi Mix 5 स्मार्टफोन 200W वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारा पहिला फोन असेल.
शाओमीने जूनमध्ये आपल्या हायपरचार्ज टेक्नॉलॉजीची घोषणा केली होती. या टेक्नॉलॉजीमध्ये स्मार्टफोन 200 वॉट वेगाने चार्ज केला जातो. ही टेक्नॉलॉजी सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या 125W पेक्षा कितीतरी वेगवान आहे. तेच अंदाज वर्तवण्यात आला होता कि शाओमी ही टेक्नॉलॉजी आपल्या नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये सादर करेल. आता बातमी आली आहे कि जून 2022 पासून शाओमी हायपरचार्ज टेक्नॉलॉजीचे मास प्रोडक्शन सुरु होणार आहे. तसेच पुढल्या वर्षी सादर होणारा Mi Mix 5 स्मार्टफोन 200W वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारा पहिला फोन असेल.
शाओमीची हायपरचार्ज टेक्नॉलॉजी पुढल्या वर्षी लाँच होणाऱ्या Xiaomi Mi MIX 5 स्मार्टफोनमध्ये दिला जाऊ शकते, अशी माहिती टेक वेबसाइट MyDrivers ने दिली आहे. म्हणजे 2022 मध्ये येणारा शाओमी मी मिक्स 5 कंपनीचा पहिला फोन असेल, जो 200W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह बाजारात येईल. शाओमीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
Xiaomi HyperCharge टेक्नॉलॉजी
जूनमध्ये कंपनीने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून 200W HyperCharge फास्ट चार्जिंग आणि 120W वायरलेस फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीची घोषणा केली होती. शाओमीने या टेक्नॉलॉजीचे प्रात्यक्षिक दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ज्यात किती वेगाने 4,000mAh ची बॅटरी या वायर्ड टेक्नॉलॉजीद्वारे चार्ज केली जाते हे दाखविले आहे. व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, फक्त 44 सेकंदात हा फोन 10 टक्के चार्ज होतो आणि फोन फुल चार्ज करण्यासाठी आठ मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो.
त्याचबरोबर शाओमीने 120W वायरलेस टेक्नॉलॉजी देखील सादर केली आहे. या दोन्हींचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी कंपनीने कस्टम बिल्ट Mi 11 Pro चा वापर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसते की, Mi 11 Pro ज्यात एक 4,000mAh ची बॅटरी आहे, फक्त एका मिनिटात 10 टक्के चार्ज झाला. तर 50 टक्के चार्ज होण्यासाठी 7 मिनिटे आणि फुल चार्जसाठी 15 मिनिटांचा वेळ लागला.