चहा गरम ठेवणार, फोनही चार्ज होणार; असा आहे भन्नाट Warm Cup
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 12:54 PM2019-11-18T12:54:03+5:302019-11-18T13:07:26+5:30
तंत्रज्ञानाच्या मदतीने जगणं अधिक सोपं झालं आहे. बाजारात अशा अनेक वस्तू उपलब्ध आहेत ज्यामुळे काम झटपट होतं.
नवी दिल्ली - तंत्रज्ञानाच्या मदतीने जगणं अधिक सोपं झालं आहे. बाजारात अशा अनेक वस्तू उपलब्ध आहेत ज्यामुळे काम झटपट होतं. शाओमी ही लोकप्रिय टेक कंपनी बाजारात नवनवीन प्रोडक्ट घेऊन येत असते. यावेळी शाओमीने आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट कप आणला आहे. हा कप साधा नसून तो वायरलेस चार्जिंग तंत्रज्ञानाचा वापर केलेला कप असणार आहे. नवा कप चहा गरम ठेवण्यासोबत मोबाईल देखील चार्ज करण्यासाठी मदत करणार आहे. Warm Cup असं या कपचं नाव असून शाओमीने तो लाँच केला आहे.
कोणत्याही प्रकारच्या वातावरणात 55 डिग्रीपर्यंत तापमान राखण्याची वॉर्म कपची क्षमता आहे. तापमानासाठी वायरलेस चार्जिंगचा वापर केला जाणार आहे. चहा किंवा कॉफी गरम ठेवण्यासाठी युजर्सना कप वायरलेस चार्जिंग पॅडवर ठेवावा लागेल. हा कप पारंपरिक चार्जरपेक्षा पूर्ण वेगळा आणि हाट टेक आहे. तसेच सुरक्षित देखील आहे. वॉर्म कप हा सिरॅमिक कपसारखाच दिसतो. वॉटरप्रूफ असल्यामुळे खराब झाल्यानंतर हा कप धुवून स्वच्छ करता येतो.
वॉर्म कपचं डिझाईन योग्य करण्यात आले असून यामुळे युजर्सना कोणत्याही प्रकारचा धोका नाही. चार तास वापर न केल्यास याचं तापमान वाढण्याची प्रक्रिया आपोआप बंद होते आणि कप स्लीप मोडमध्ये जातो. कपचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्मार्टफोन चार्ज करण्यासाठीही याचा वापर करता येतो. चार्जिंग पॅडच्या मदतीने फोन चार्ज होतो. मात्रयासाठी युजर्सच्या फोनमध्ये वायरलेस चार्जिंग फीचर असणं गरजेचं आहे. वॉर्म कपची किंमत ही 189 युआन म्हणजे जवळपास 2000 रुपये आहे. सध्या हा कप चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. भारतात कधी लाँच करणार याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
चीनची काही काळात विक्रीची उच्च शिखरे पादाक्रांत करणारी कंपनी शाओमीने आता इलेक्ट्रॉनिक क्षेत्राकडे मोर्चा वळविला आहे. शाओमीने एमआयच्या 65 इंचाचा 4 के स्मार्ट टीव्ही लाँच करतानाच एमआय बँड 4, मोशन अॅक्टिव्हेटेड नाईट लाईट आणि वॉटर प्युरिफायर लाँच केला आहे. नाईट लाईटच्या निधी जमविण्यासाठी याची विक्री सुरू करण्यात आली असून 500 रुपयांना ही लाईट उपलब्ध आहे. हा बल्ब माणूस जसा हालचाल करेल त्या दिशेने प्रकाश फेकण्यासाठी वळतो. तर अन्य उत्पादनांची विक्री 29 सप्टेंबरपासून सुरू केली जाणार आहे. ही सर्व उत्पादने फ्लिपकार्टसह एमआयच्या वेबसाईटवर खरेदी करता येणार आहेत. एमआयचा स्मार्ट टीव्ही 17999 रुपयांरपासून मिळणार आहे. तर एमआय बँडची किंमत 2299 रुपये आणि वॉटर प्युरिफायरची किंमत 11999 रुपये असणार आहे.