ओरिजनलला 'डुप्लिकेट' भारी पडले; Xiaomi ने टाकले अॅपलला मागे
By हेमंत बावकर | Published: October 30, 2020 04:56 PM2020-10-30T16:56:07+5:302020-10-30T16:59:45+5:30
Xiaomi Smartphone Market: यंदा जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान तिसऱ्या तिमाहीमध्ये 353.6 दशलक्ष स्मार्टफोन पाठविण्यात आले. आयडीसीने कोरोनामुळे 9 टक्क्यांची घट होईल असा अंदाज लावला होता. मात्र, अपेक्षेपेक्षा जास्त फोन पाठविण्यात आल्याने कोरोनाचा एवढा परिणाम झाला नसल्याचे म्हटले आहे.
नवी दिल्ली : इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनन (IDC) ने यंदा तिसऱ्या तिमाहीमध्ये स्मार्टफोन शिपमेंटसंबंधीत रिपोर्ट जारी केला आहे. सॅमसंगने जगभरात डंका गाजवत पहिला क्रमांक कायम राखला आहे. तर शाओमीने (Xiaomi) अॅपलला मागे टाकून तिसरा क्रमांक पटकावला आहे. महत्वाचे म्हणजे शाओमीच्या मालकाने अॅपलच्या मालकाची यशोगाथा पाहून ही कंपनी सुरु केली होती. यानंतर अॅपलसारखेच दिसणारे परंतू अँड्रॉईडवर चालणारे स्मार्ट फोन लाँच केले होते.
कोरोना संकट असले तरीही स्मार्टफोन पाठविण्यामध्ये फारसा फरक पडलेला नाही. या तिमाहीत 1.3 टक्के घट झाली आहे. कोरोना महामारीमुळे जगभरातील अनेक देशांमध्ये तीन ते चार महिने लॉकडाऊन पडले होते. तरीही हे आकडे खूप चांगले आहेत.
यंदा जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान तिसऱ्या तिमाहीमध्ये 353.6 दशलक्ष स्मार्टफोन पाठविण्यात आले. आयडीसीने कोरोनामुळे 9 टक्क्यांची घट होईल असा अंदाज लावला होता. मात्र, अपेक्षेपेक्षा जास्त फोन पाठविण्यात आल्याने कोरोनाचा एवढा परिणाम झाला नसल्याचे म्हटले आहे.
रिपोर्टनुसार सॅमसंग 22.7 टक्के स्मार्टफोन बाजारावर वर्चस्व ठेवून आहे. कंपनीने 2020 च्या तिसऱ्या तिमाहीत 80.4 दशलक्ष युनिट पाठविण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीने 2.9 टक्के जास्त युनिट बाजारात उपलब्ध केले होते. म्हणजे कोरोनाचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर 51.9 दशलक्ष युनिट विकत हुवावे ही चिनी कंपनी आहे. तिचे बाजारावर 14.7 टक्के वर्चस्व आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत शिपमेंटमध्ये 22 टक्क्यांची घट झाली आहे.
दुसरीकडे तिसऱ्या नंबरवर चीनच्याच आणखी एका कंपनीने मजल मारली आहे. अॅपलसारख्या कंपनीला मागे टाकून शाओमीने 46.5 दशलक्ष युनिट बाजारात विकले आहेत. शाओमीने 13.1 टक्के बाजारावर कब्जा केला आहे. तसेच कमी किंमतीतील फोन आणत 42 टक्क्यांची वाढ नोंदविली आहे.
अॅपल आणि व्हिवोने अनुक्रमे 11.8 टक्के आणि 8.9 टक्के बाजारावर कब्जा केला आहे. महत्वाचे म्हणजे आयफोन 11 हा जगातील सर्वात जास्त खपाचा स्मार्टफोन होता. अॅपलने 41.6 दशलक्ष युनिट आणि व्हिवोने 31.5 दशलक्ष युनिट विकले आहेत.