शाओमी रेडमी ५ ए स्मार्टफोनची नवीन आवृत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 12:59 PM2018-03-16T12:59:24+5:302018-03-16T12:59:24+5:30
हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट व मी.कॉम या पोर्टल्ससह शाओमीच्या मी होम या स्टोअर्समधून ग्राहकांना खरेदी करता येईल.
मुंबई: शाओमी कंपनीने आपल्या शाओमी रेडमी ५ए या स्मार्टफोनची लेक ब्ल्यू या रंगाची नवीन आवृत्ती भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याचे जाहीर केले आहे.
शाओमी रेडमी ५ ए हा स्मार्टफोन गत नोव्हेंबर महिन्यात भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आला होता. प्रारंभी याला डार्क ग्रे आणि गोल्ड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले होते. या वर्षाच्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात याची रोझ गोल्ड या रंगाची नवीन आवृत्ती लाँच झाली होती. आता या मॉडेलची लेक ब्ल्यू ही नवीन आवृत्ती ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. यातील उर्वरित फिचर्स हे आधीप्रमाणेच राहतील.
शाओमी रेडमी ५ए या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा, १६:९ अस्पेक्ट रेशो असणारा आणि एचडी (१२८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आहे. याच्या दोन व्हेरियंटमध्ये २ जीबी रॅम व १६ जीबी स्टोअरेज तसेच ३ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोअरेज असून हे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येईल. यात एफ/२.२ अपार्चर, एलईडी फ्लॅश आणि ऑटो-फोकससह १३ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये एफ/२.० अपार्चरसह ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. यातील बॅटरी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. तर हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे असून यावर शाओमी कंपनीचा एमआययुआय ९ हा युजर इंटरफेस आहे. यात फोर-जी व्हिओएलटीईसह ब्ल्यु-टुथ, वाय-फाय, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स तर अॅक्सलेरोमीटर व प्रॉक्झीमिटी सेन्सर आहेत..
शाओमी रेडमी ५ए स्मार्टफोनची लेक ब्ल्यू ही आवृत्तीदेखील २ जीबी रॅम व १६ जीबी स्टोअरेज तसेच ३ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायांमध्ये अनुक्रमे ५,९९९ आणि ६,९९९ रूपये मूल्यात ग्राहकांना खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट व मी.कॉम या पोर्टल्ससह शाओमीच्या मी होम या स्टोअर्समधून ग्राहकांना खरेदी करता येईल.