शाओमी रेडमी 5 'ए'ची विक्रमी विक्री
By शेखर पाटील | Published: January 19, 2018 03:23 PM2018-01-19T15:23:15+5:302018-01-19T15:50:30+5:30
शाओमी कंपनीच्या रेडमी ५ए या स्मार्टफोनला भारतीय बाजारपेठेत दणदणीत यश मिळाले असून एका महिन्याच्या आतच याचे तब्बल १० लाखांपेक्षा जास्त मॉडेल्स विकले गेल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे.
शाओमी कंपनीच्या रेडमी ५ए या स्मार्टफोनला भारतीय बाजारपेठेत दणदणीत यश मिळाले असून एका महिन्याच्या आतच याचे तब्बल १० लाखांपेक्षा जास्त मॉडेल्स विकले गेल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे.
शाओमी कंपनीने गेल्या महिन्यातच रेडमी ५ए हा किफायतशीर मूल्य असणारा स्मार्टफोन लाँच केला होता. भारतीय ग्राहकांना याचे २ जीबी रॅम/१६ जीबी स्टोअरेज आणि ३ जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेज असे दोन पर्याय अनुक्रमे ५,९९९ आणि ६,९९९ रूपये मूल्यात सादर करण्यात आले होते. शाओमी कंपनीने देश का स्मार्टफोन या कॅचलाईनसह याची जोरदार प्रसिध्दी केली. अर्थात उत्तमोत्तम फिचर्स आणि किफायतशीर मूल्यामुळे या मॉडेलला जोरदार यश लाभले आहे. एका महिन्याच्या आत याचे १० लाखांपेक्षा जास्त मॉडेल्स विकले गेल्याची माहिती कंपनीच्या भारतीय विभागाचे प्रमुख मनुकुमार जैन यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
शाओमी रेडमी ५ए या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा, १६:९ अस्पेक्ट रेशो असणारा आणि एचडी (१२८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आहे. वर नमूद केल्यानुसार याच्या दोन व्हेरियंटमध्ये २ जीबी रॅम व १६ जीबी स्टोअरेज तसेच ३ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोअरेज असेल. हे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येईल. यात एफ/२.२ अपार्चर, एलईडी फ्लॅश आणि ऑटो-फोकससह १३ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये एफ/२.० अपार्चरसह ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. यातील बॅटरी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. तर हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे असून यावर शाओमी कंपनीचा एमआययुआय ९ हा युजर इंटरफेस असेल. यात फोर-जी व्हिओएलटीईसह ब्ल्यु-टुथ, वाय-फाय, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स तर अॅक्सलेरोमीटर व प्रॉक्झीमिटी सेन्सर असतील.