शोआमीचे फोन वापरणाऱ्यांना मिळणार 23 हजारांचे व्हाऊचर; 10 व्या वर्धापन दिनानिमित्त कंपनीची घोषणा
By सिद्धेश जाधव | Published: August 12, 2021 03:37 PM2021-08-12T15:37:31+5:302021-08-12T15:37:40+5:30
Mi 1Users Refund: Xiaomi आपल्या 10व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कंपनीचा पहिला स्मार्टफोन Mi 1 प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना कॅशबॅक देत आहे
Xiaomi ने आपल्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त चीनमध्ये आपला लेटेस्ट फ्लॅगशिप Mi Mix 4 स्मार्टफोन लाँच केला आहे. हा शाओमीचा पहिला अंडर डिस्प्ले कॅमेरा स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनसोबत कंपनीने तीन वर्षानंतर टॅबलेट सीरिज Mi Pad 5 लाँच केली आहे. तसेच कंपनीने सादर केलेला सायबर डॉग रोबोट देखील चर्चेत आहे. या सर्व घोषणांमध्ये कंपनीच्या एका घोषणेचे कौतुक चहुबाजुंनी केले जात आहे, ती म्हणजे सर्वात पहिला मी स्मार्टफोन विकत घेणाऱ्या ग्राहकांना मोफत व्हाऊचर देण्याची.
आपल्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त शाओमीने चीनी युजर्सना मोठी भेट देण्याची घोषणा केली आहे. Xiaomi चा सर्वात पहिला Mi 1 स्मार्टफोन प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत कंपनीने 1,999 युआनचे व्हाऊचर देण्याची घोषणा केली आहे. 1,999 युआन ही Mi M1 स्मार्टफोनची किंमत होती. हा स्मार्टफोन 1,84,600 लोकांनी विकत घेतला होता. 2011 मध्ये आलेल्या या स्मार्टफोनने शाओमीला 370 दशलक्ष चीनी युआन पेक्षा जास्त कमाई मिळवून दिली होती. या कमाईच्या जोरावर कंपनी इथवर आल्याचे सीईओ Lei Jun यांनी म्हटले आहे.
Xiaomi आपल्या 10व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कंपनीचा पहिला स्मार्टफोन Mi 1 प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना कॅशबॅक देत आहे. या ऑफरसाठी युजर्सना Mi ID ची माहिती द्यावी लागेल, जिच्या माध्यमातून Xiaomi च्या वेबसाइटवरून हा फोन ऑर्डर केला गेला होता. Mi 1 स्मार्टफोन कंपनीने चीनमध्ये सुमारे 23 हजार रुपयांमध्ये सादर केला होता. गेल्या दहा वर्षात Xiaomi फक्त चीनपुरती मर्यादित राहिली नसून कंपनीने स्मार्टफोन शिपमेंटच्या बाबती जगात पहिले स्थान मिळवले आहे.