Yahoo ने बंद केली भारतातील ‘ही’ सेवा; सरकारच्या निर्णयामुळे घेतली माघार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 12:33 PM2021-08-27T12:33:00+5:302021-08-27T12:33:35+5:30
Yahoo News India Shut Down: Yahoo ने भारतातील आपली न्यूज वेबसाईट्स बंद केली आहे. सरकारच्या नव्या एफडीआय नियमांमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
Yahoo ने भारतातील आपली न्यूज वेबसाईट बंद केली आहे. भारत सरकारने फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या नियमांमध्ये बदल केल्यामुळे याहूने हा निर्णय घेतला आहे. देशात डिजिटल कन्टेन्ट पब्लिश करणाऱ्या मीडिया कंपन्यांमधील परदेशी गुंतवणूक मर्यादित करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे याहूने आपली न्यूज वेबसाईट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही माहिती याहूने एक नोटीस जारी करून दिली आहे. कंपनीने नोटीसमध्ये म्हटले आहे कि, “26 ऑगस्टपासून Yahoo India कोणतेही कन्टेन्ट प्रकाशित करणार नाही. या निर्णयाचा याहू अकॉउंट, ई-मेल आणि सर्चवर कोणताही परिणाम होणार नाही. याहू न्यूज व्यतिरिक्त इतर कोणत्याही सेवेत बदल होणार नाही. आम्ही आमच्या वाचकांचे आभार मानतो.” याहूने भारतातील याहू न्यूज, याहू क्रिकेट, फायनान्स, एंटरटेनमेंट आणि मेकर्स इंडिया या सेवा बंद केल्या आहेत.
हा तडकफडकी घेतलेला निर्णय नाही, असे कंपनीने सांगितले आहे. देशातील डिजिटल कन्टेन्ट पब्लिशिंगच्या नियमात बदल झाल्यामुळे कंपनी 20 वर्ष जुनी सेवा बंद करत आहे. त्यामुळे 26 ऑगस्ट, 2021 पासून कंपनीने डिजिटल कन्टेन्ट पब्लिश करणे बंद केले आहे. कंपनीने भारतीय वाचकाने आभार मानले आहेत. भारतात ऑक्टोबरपासून नवीन एफडीआय नियम लागू होतील. हे नियम लागू झाल्यानंतर भारतात डिजिटल मीडिया कंपन्या फक्त 26 टक्क्यांपर्यंतची परदेशी गुंतवणूक स्वीकारू शकतात.