तुम्ही रोज Good Morningचे मेसेज करता का? जगाचं लई नुकसान होतंय राव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 06:53 PM2021-09-17T18:53:54+5:302021-09-17T18:56:57+5:30
सकाळ झाली की पाठव गुड मॉर्निंग मेसेज! देशातल्या कोट्यवधी लोकांना मेसेज पाठवण्याची सवय
नवी दिल्ली: सकाळ झाली की व्हॉट्स ऍपवर गुड मॉर्निंग मेसेज सुरू होतात. काही जणांकडे तर मेसेजचा अक्षरश: पाऊस पडतो. सुंदर फुलं. उगवणारा सूर्य, हसणारं लहान मूल, प्रेरणादायी विचारांचे फोटो नातेवाईक, मित्रमैत्रिणींना पाठवणाऱ्या भारतीयांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. मात्र भारतीयांच्या या गुड मॉर्निंग मेसेजचा मोठा फटका जगाला बसत असल्याचं समोर आलं आहे.
भारतीयांच्या असंख्य गुड मॉर्निंग मेसेजमुळे इंटरेनट जाम होतं. त्यामुळे सकाळच्या सुमारास बऱ्याचदा इंटरनेटचा वेग मंदावतो. एखादी गोष्ट सर्च करत असल्यास त्यासाठी वेळ लागतो. संपूर्ण जगभरात अशी समस्या जाणवते. ही समस्या नेमकी कशामुळे उद्भवते, हे शोधण्यासाठी तज्ज्ञांनी बरीच मेहनत केली. अखेरीस समस्येचं मूळ त्यांच्या लक्षात आलं. कोट्यवधी भारतीय पाठवत असलेले गुड मॉर्निंग मेसेज इंटरनेटचा वेग मंदावण्यास जबाबदार असल्याचं संशोधनातून समोर आलं.
आकडेवारी काय सांगते?
भारतात जवळपास ४० कोटी लोक व्हॉट्स ऍपचा वापर करतात. सकाळ होताच लोक एकमेकांना गुड मॉर्निंग मेसेज पाठवू लागतात. मेसेजेसचा अक्षरश: पूर येतो. त्यामुळे इंटरनेटची बँडविड्थ कमी पडू लागते.
गेल्या ५ वर्षांत गुड मॉर्निंग मेजेससाठी शोधणाऱ्यांची संख्या १० पटीनं वाढली आहे. तर डाऊनलोड करणाऱ्यांचं प्रमाण ९ पटीनं वाढलं आहे. यामुळे जगभरात इंटरनेटचा वेग तर मंदावतोच. पण मोबाईलमधील स्टोरेजदेखील भरू लागतो.