युट्युब अॅपवर येणार डार्क मोडसह अन्य फिचर्स
By Sunil.patil | Published: January 17, 2018 11:16 AM2018-01-17T11:16:22+5:302018-01-17T11:17:05+5:30
युट्युब या व्हिडीओ शेअरिंग साईटच्या अॅपवर लवकरच डार्क मोडसह अन्य फिचर्स देण्यात येणार असून आगामी अपडेटमध्ये याचा समावेश करण्यात येणार आहे.
युट्युब या व्हिडीओ शेअरिंग साईटच्या अॅपवर लवकरच डार्क मोडसह अन्य फिचर्स देण्यात येणार असून आगामी अपडेटमध्ये याचा समावेश करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात युट्युब साईटचा कायापालट करण्यात आला होता. यात अगदी युट्युब लोगोतील बदलासह या साईटला मटेरियल डिझाईन प्रदान करण्यात आले होते. यासोबत डार्क मोड हे विशेष फिचर देण्यात आले होते. याच्या अंतर्गत कुणीही युजर युट्युब साईटवरील व्हिडीआ बघतांना पार्श्वभागाला गडद काळ्या रंगात बदलू शकतो. विशेष करून रात्री याचा वापर केल्यास डोळ्यांना कमी त्रास होत असल्याचे युट्युब साईटतर्फे जाहीर करण्यात आले होते. अर्थात ही सुविधा आजवर फक्त संगणकावरून युट्युब वापरणार्यांनाच देण्यात आली होती. आता मात्र स्मार्टफोनच्या युजर्सलाही याचा वापर करता येणार आहे. कारण काही युजर्सला हे फिचर दिसू लागले आहे. यामुळे याची चाचणी सुरू असून आगामी काळात अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींच्या युजर्सला ही सुविधा अपडेटच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
युट्युब अॅपवर याच्या जोडीला लवकरच इन्कॉग्निटो मोड देखील देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या अॅपच्या सोर्स कोडमध्ये डार्क थीमसह इन्कॉग्निटो मोडची सुविधादेखील दिसून आली आहे. खरं तर युट्युब वापरणार्यांना आधीच आपली सर्च आणि वॉच हिस्ट्री पॉज करण्याची सुविधा दिलेली आहे. मात्र यासाठी सेटींगमध्ये बदल करावा लागतो. तथापि, इन्कॉग्निटो मोडसाठी एक स्वतंत्र आयकॉन देण्यात येणार असून यावर क्लिक करून कुणीही आपल्या वॉच/सर्च हिस्ट्रीला पॉज करून अज्ञात पध्दतीत युट्यु साईटवर मुशाफिरी करू शकतो. तसेच नवीन आवृत्तीत कुणीही युजर स्वाईप करून युट्युब साईटवरील जाहिरातींना टाळू शकतो. युट्युब अॅपच्या आगामी अपडेटमध्ये हे सर्व फिचर्स मिळू शकतात असे मानले जात आहे.