युट्युब मॅसेंजर: व्हिडीओ शेअरिंगसोबत करा चॅटींग !
By शेखर पाटील | Published: August 11, 2017 03:25 PM2017-08-11T15:25:11+5:302017-08-11T15:25:42+5:30
युट्युब या व्हिडीओ शेअरिंग साईटने इन-अॅप मॅसेंजर सादर केला असून याच्या माध्यमातून व्हिडीओला शेअर करून त्यावर चॅटींग करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
युट्युब या व्हिडीओ शेअरिंग साईटने इन-अॅप मॅसेंजर सादर केला असून याच्या माध्यमातून व्हिडीओला शेअर करून त्यावर चॅटींग करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
युट्युब या व्हिडीओ शेअरिंग साईटवर गत काही महिन्यांपासून इन-अॅप मॅसेंजरची सुविधा प्रयोगात्मक अवस्थेत देण्यात आली होती. आता जगभरातील युजर्सला हे फिचर प्रदान करण्यात आले आहे. यात व्हिडीओ पाहत असतांना त्यावर चर्चा करण्याची आणि त्या व्हिडीओला आपल्या मित्रांसोबत शेअर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ही सुविधा अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींचा वापर करणार्यांना मिळाली आहे.
युट्युब मॅसेंजरची सुविधा ही स्वत:चे युट्युब चॅनल असणार्या युजर्सला वापरता येणार आहे. या युजर्सनी लॉगीन केल्यावर त्यांना प्रत्येक व्हिडीओच्या खाली शेअर हा पर्याय टॅबच्या स्वरूपात देण्यात आलेला असल्याचे दिसून येईल. यावर क्लिक केल्यावर कुणीही आपले मित्र, कुटुंबिय आदींना कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये अॅड करू शकतात. या यादीतील लोकांना कोणताही व्हिडीओ शेअर करता येतो. या व्हिडीओबाबत चर्चा करण्यासह इतरांना चर्चेचे आमंत्रणही या माध्यमातून देता येते. तर याच पध्दतीने इतरांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर चॅटींग करण्याची सुविधादेखील या मॅसेंजरमध्ये देण्यात आली आहे.
युट्युब व्हिडीओजवर आधीपासूनच कॉमेंटची सुविधा देण्यात आली आहे. मात्र याच्या मर्यादा लक्षात घेऊन इन-अॅप मॅसेंजर प्रदान करण्यात आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या माध्यमातून युट्युब व्हिडीओ पाहतांनाचे एंगेजमेंट वाढून अर्थातच साईटला लाभ होणार आहे. तर या मॅसेंजरच्या रूपाने युट्युबने काळाची पावले ओळखल्याचेही मानले जात आहे. सध्या सोशल साईटच्या तुलनेत मॅसेंजर मोठ्या प्रमाणात लोकप्रियत होत आहेत. यामुळेच युट्युब या व्हिडीओ शेअरिंग साईटने हा मार्ग पत्करल्याची चर्चा आता टेक्नो-वर्ल्डमध्ये सुरू आहे.