तरूणाईची फेसबुकपेक्षा यू-ट्युबला जास्त पसंती
By शेखर पाटील | Published: June 4, 2018 10:58 AM2018-06-04T10:58:04+5:302018-06-04T11:09:58+5:30
तरूणाई ही फेसबुकपासून दूर जात असल्याची बाब स्पष्टपणे दिसून आली आहे.
फेसबुकच्या युजर्सच्या संख्येत घट होत असून तरूणाईची युट्युब या व्हिडीओ शेअरींग साईटला वाढीव पसंती मिळत असल्याचे ताज्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
'प्यु रिसर्च सेंटर' या ख्यातप्राप्त संस्थेने अमेरिकेतील युजर्सबाबतचा अहवाल नुकताच सादर केला आहे. यात अमेरिकन तरूणाई ही फेसबुकपासून दूर जात असल्याची बाब स्पष्टपणे दिसून आली आहे. विशेष बाब म्हणजे हा वर्ग युट्युबवर आपला वेळ जास्त व्यतीत करत असल्याचेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. खरं तर कुमारवयीन आणि तरूण गट हा फेसबुकपासून दूर राहत असल्याचे गेल्या अनेक वर्षांपासून दिसून येत आहे. स्नॅपचॅट या अॅपच्या यशात याच वयोगटाचा मोलाचा वाटा आहे. तथापि, यासोबत आता या वयोगटात युट्युबला मिळणारी पसंती ही आश्चर्यकारक बाब मानली जात आहे.
वास्तविक पाहता, युट्युबच्या व्हिडीओ शेअरिंगमधील मिरासदारीला फेसबुकने जोरदार टक्कर दिली आहे. आता फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हिडीओ अपलोड-शेअरींगसह पाहिले जात आहेत. मात्र असे असले तरी युट्युबला खर्या अर्थाने हादरा देण्यात फेसबुकला अपयश आल्याचेही आपण लक्षात घेण्याची गरज आहे. अर्थात कितीही आटोकाट प्रयत्न करून युट्युबची घोडदौड सुरूच आहे. यात आता तरूणाईचा कलदेखील याकडे वळल्याची बाब ही फेसबुकसाठी धोक्याचा इशारा मानली जात आहे.